Breaking News

गुजरात सरकारवर संतापले गडकरी

Nitin Gadkari
नवीदिल्ली
‘मोटर व्हेइकल अ‍ॅक्ट 2019’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे; परंतु लोकांची नाराजी पाहता काही राज्ये यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपामई यांनी दंडाच्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संताप व्यक्त करत ‘मोटर व्हेइकल अ‍ॅक्ट 2019’ मध्ये कोणालाही बदल करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
गडकरी म्हणाले, की मी सर्व राज्य सरकारांकडून माहिती घेतली आहे. हा कायदा लागू करणार नाही असे आतापर्यंत कोणत्याही राज्याने सांगितलेले नाही आणि कोणत्याही राज्याला यातून बाहेर पडण्याची सूटही नाही. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर आकारण्यात येणारा दंड हा कोणाचेही खिसे भरण्यासाठी नाही. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी अतिवेगात गाडी चालवल्यामुळे आपल्याकडूनही दंड आकारण्यात आला होता, असेही ते म्हणाले.

रूपाणी यांनी नुकतीच नव्या दंडाच्या रकमेबाबत घोषणा केली. पोलिसांनी विना हेलमेट पकडल्यास नव्या नियमांनुसार आकारल्या जाणार्‍या एक हजार रुपयांऐवजी गुजरातमध्ये 500 रुपये आकारण्यात येणार आहे. सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्यास एक हजार रुपयांऐवजी 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. याव्यतिरिक्त धोकादायकरित्या वाहन चालवल्यास नव्या नियमांनुसार पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे; पंरतु यासाठी गुजरातमध्ये तीन चाकी वाहनांकडून दीड हजार रुपये, हलक्या वाहनांसाठी तीन हजार रुपये आणि अन्य वाहनांसाठी 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.