Breaking News

अकरावीच्या शिक्षकांना प्रशिक्षणाचा अभाव

अध्यापन पद्धती, मूल्यमापनाबाबत शिक्षक अनभिज्ञ ;  शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा सावळा गोंधळ

कर्जत/प्रतिनिधी
चालू वर्षी अकरावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमाचे अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. बदलत्या अभ्यासक्रमानुसार अध्यापन पद्धती, मूल्यमापन योजना तसेच विद्यार्थ्यांकडून अध्यापनाची उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी अध्यापकांना प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मात्र, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होऊन तीन महिने उलटले तरीही शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित आहेत. प्रशिक्षण नसल्याने त्याचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. मात्र, पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील नियोजनाच्या अभावामुळे शिक्षकांना दिशाहीन अध्यापन करावे लागत आहे. ही दुर्दैवी बाब आहे.
 यंदाच्या वर्षीपासून अकरावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. शिक्षणाचे दैनंदिन व्यवहारात कृतिशील उपयोजन, पुढील शिक्षण संशोधन, उद्योग, व्यवसाय यासाठी आवश्यक कौशल्याची पायाभरणी, प्रगल्भ आणि जबाबदार नागरिक बनविणे, नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचा विकास आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे शिक्षण विभागाला बंधनकारक आहे. मात्र, पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून अद्यापही प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. बदलत्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना अध्यापनाची पद्धती ठरवावी लागते. याबाबत तज्ञ मार्गदर्शकांकडून शिक्षकांना प्रशिक्षित केले जाते. शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालयांना मूल्यमापन पद्धतीबाबत अद्यापही अंधारात ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे शिक्षकांकडून दिशाहीन पद्धतीने अध्यापन केले जात आहे. या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभागाची डोळेझाक होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात अहमदनगरचे शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांना विचारले असता, त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रशिक्षणाचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले. घटक चाचणी तोंडावर आली असतानाही शिक्षक व विद्यार्थ्यांना मूल्यमापन योजनाच माहीत नसल्याने परिस्थिती रामभरोसे असल्याचे चित्र दिसते. शिक्षणमंत्र्यांकडून शिक्षणातील आधुनिकीकरण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांतील मूल्यांची जोपासना आदी बाबींवर लक्ष केंद्रित केले जात असताना प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र, विभागाची कृतीशून्यता दिसून येत आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घटक चाचणीचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र, शिक्षकांनाच मूल्यमापनाची कसलीच कल्पना नाही. खासगी कंपनीच्या प्रकाशकांनी मार्गदर्शक पुस्तके बाजारात आणलेली असून त्यात मूल्यमापन रचना देण्यात आलेली आहे. खासगी व्यवसायिकांच्या व्यवसायाला वाव देण्यासाठीच शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांकडून प्रशिक्षणाला विलंब केला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

 बालभारतीकडून नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अकरावीच्या वर्गांना अध्यापन करणार्‍या शिक्षकांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येईल.
- मीनाक्षी राऊत, सहाय्यक शिक्षण संचालक, पुणे