Breaking News

शेतकऱ्यांची आठवण फक्त मतांपुरतीच : अड. काकडे अँकर

शेवगाव/प्रतिनिधी
शेतकऱ्यांची या ५ वर्षात अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. शेती करणे हे पाप आहे की काय ? अशी धारणा शेतकऱ्यांची झाली आहे. निसर्ग साथ देत नाही. शासन साथ देत नाही, लोकप्रतिनिधी फक्त मतापुरतेच शेतकऱ्यांकडे येतात. पूर्व भागात तर शेतकरी मोडून गेला आहे. असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे यांनी येथे केले.

    जनशक्ती विकास आघाडी, शेवगाव पाथर्डीच्या वतीने जनसंपर्क अभियान दौऱ्यानिमित्त बोधेगाव येथे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या भावना काय ? जनशक्तीने कोणती भूमिका घेतली पाहिजे ? यासाठी संवाद बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब मासाळ हे होते. यावेळी जि.प.सदस्य हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, संजय आंधळे, माणिक गर्जे, बबनराव भोसले, भाऊसाहेब बर्डे, किशोर दहिफळे, बप्पासाहेब बर्डे आदी उपस्थित होते.

   या प्रसंगी बोलताना अड. काकडे म्हणाले की, शेवगाव तालुक्यातून पैठण धरणाचे पाणी दिसते. तालुक्यासाठीचे हक्काचे पाणी येथे शिल्लक आहे. गेल्या पाच वर्षात आमदार ताजनापुर लिफ्ट टप्पा २ पूर्ण करू शकले नाहीत. कोणतेही भरीव काम लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत. गेल्या चार पिढ्यापासून सत्ता त्यांच्या घरात नांदते आहे. वंशपरंपरेने आमदारकी ते भोगत आहेत. मग या भागाचा विकास का झाला नाही. तालुक्यात फक्त मते मागायलाच यायचे अशी प्रस्थापित पुढाऱ्यांची सवय आहे. तुम्ही जर साथ दिली तर परिस्थिती बदलू शकते.

 हर्षदा काकडे म्हणाल्या की, आपल्या जायकवाडीचे पाणी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात नेले जात आहे. शेजारीच गेवराई तालुक्यातील आमदारांनी मोठी पाईपलाईन टाकून उद्योग, पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी नेण्याचे काम चालू केले आहे. परंतु या पूर्व भागात साधे पिण्यासाठी पाणी लोकप्रतिनिधी आणू शकले नाहीत. त्यामुळे तुम्ही साठी दिली तर हे काम आम्हीच करू.