Breaking News

आयडीबीयला नऊ हजार कोटींचे बेलआऊट पॅकेज

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; सरकार आणि एलआयसीकडून मदतीचा हात मिळणार

नवीदिल्ली
आयडीबीआय बँकेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी 9 हजार 296 कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज मंजूर केले आहे.

केंद्र सरकार आणि एलआयसी मिळून हजारो कोटींच्या आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या आयडीबीआय बँकेला ही मदत करणार आहेत. यामध्ये सरकारकडून चार हजार 553 कोटी रुपये तर एलआयसीकडून 4 हजार 743 कोटी रुपये दिले जाणार आहेत. यासंबंधी एका प्रस्तावास मंगळवारी कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाली.
कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंबधी माहिती दिली. त्यांनी सांगितले, की सरकारने आयडीबीआय बँकेसाठी 9 हजार कोटींच्या बेलआउट पॅकेजला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने बँकांना बळकटी आणण्याच्या दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता होताना दिसते आहे.

आयडीबीआयच्या सध्या 1892 शाखा, 1407 केंद्र व 3705 एटीएम आहेत. आयडीबीआयला या चालू आर्थिक वर्षातील 30 जून पर्यंतच्या पहिल्या तिमाहीत तीन  हजार 800.84 कोटी रुपयांचा तोटा झाला. अडकलेल्या कोट्यवधींच्या कर्जांची रक्कम वाढत असल्याने आयडीबीआयच्या तोट्यात अधिकच भर पडत असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभराअगोदर एप्रिल-जूनच्या कालावधीत बँकेच्या तोट्याची रक्कम दोन हजार 409.89 कोटी रुपये होती. चालू आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत बँकेची अडकलेली कर्ज म्हणजेच एनपीएसाठीच्या तरतुदीत वाढ होऊन ते 7 हजार 9.49 कोटी रुपये झाले आहे. जे मागील वर्षी या कालावधीत 4 हजार 602.55 कोटी रुपये होते.


बँकेचे उत्पन्नही घटले
बँकेकडून शेअर बाजारास देण्यात आलेल्या माहितीनुसार पुनरावलोकन कालावधीदरम्यान बँकेचे एकूण उत्पन्न घटून पाच हजार 923.93 कोटी रुपये आहे. 2018-19 च्या पहिल्या तिमाहीत 6 हजार 402.50 कोटी रुपये उत्पन्न होते.