Breaking News

झेंडूची आवक कमी, भाव वधारला

मुंबई 
 सांगली-कोल्हापूरच्या महापूराचा फटका फुलशेतीला बसला आहे. शुक्रवापर्यंत दादर फुलबाजारात झेंडूची आवक अगदीच कमी असल्याने प्रतिकिलो झेंडूचा भाव 120 रुपयांपर्यंत गेला होता. शेवंतीचा भाव दोनशे रुपयांपर्यत चढला होता. पण, शनिवारी जुन्नर, सासवड, पुरंदर आणि कर्नाटकातील आवक वाढल्यानंतर भाव निम्म्यावर आला.
गेल्या वर्षी घाऊक बाजारात झेंडूचा प्रतिकिलो भाव हा वीस रुपये होता, मात्र यावर्षी आवक मर्यादित असल्यामुळे तो वाढून 50 ते 60 रुपयांपर्यत स्थिरावला. शुक्रवापर्यंत तर यावर्षी झेंडू पुरेसा मिळेल की नाही हीच चिंता होती, असे दादर फुलबाजारातील घाऊक विक्रेते संजय जाधव यांनी सांगितले.
शनिवारी बंगळुरुजवळच्या कोलार, चिक्कबेलापूर, अनिकेल अशा गावांमधून येणारा झेंडू नेहमीपेक्षा दुपट्टीने बाजारात आला. त्याचबरोबर सोलापूर, नाशिक परिसरातून अनेक शेतकरी स्वत:च चार-पाच जण एकत्र येऊन ट्रक घेऊन दादर बाजारात आले होते. घाऊक बाजारात न जाता बाहेर रस्त्यावरच त्यांनी उत्तम प्रतिचा झेंडू 50 रुपये किलोपर्यंत विकला. सांगली-कोल्हापूरकडील झेंडू मर्यादीत असल्यामुळे यंदा त्यांना चांगला भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील पूराचा फटका न बसलेल्या गावांमधून झेंड हा प्रथम कुरुंदवाड, नांदणी येथील बाजारात येतो. त्यानंतर तो मुंबईला पाठवला जातो. या झेंडूची आवक गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
झेंडू व्यतिरिक्त पूजेसाठी, सजावटीसाठी लागणार्‍या फुलांच्या बाजारात फार मोठा फरक पडलेला नाही. मात्र गणपतीसाठी महत्त्वाचे समजले जाणारी जास्वंद शेकडा आठशे ते एक हजार रुपयांपर्यंत वधारली होती.
मोगरा, गुलछडी, लिली या फुलांचा बाजार हा यंदा मर्यादितच असून, तो तेवढ्याच प्रमाणात सुरु असल्याचे दादर येथील व्यापार्‍यांनी सांगितले.