Breaking News

पोटावर पाय देणारी झळाळी!

सोन्या, चांदी आणि हिर्‍यांच्या व्यापारात समृद्धी दिसत असली, तरी ती ठराविक लोकांपुरती मर्यादित असते. गेल्या 19 वर्षांत एकीकडं सोन्यानं सातशे टक्का परतावा दिला असताना दुसरीकडं सोन्याच्या, चांदीच्या आणि हिर्‍यांच्या वाढत्या भावानं आणि कररचनेनं सराफ, हिरे व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यांच्यापेक्षाही मोठा फटका विक्रेते आणि कारागीरांना बसला असून त्यातून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

चीन-अमेरिका व्यापार युद्ध, कच्च्या तेलाच्या भावातील अनिश्‍चितता आणि जीएसटीच्या दराचा एकत्रित परिणाम सोने, हिरे आणि चांदीच्या व्यापारावर झाला आहे. एकीकडं बचतीतून मिळणारा परतावा कमी झाला असताना दुसरीकडं शाश्‍वत परतावा देणार्‍या सोन्याच्या भावात गेल्या काही महिन्यांत सरासरी दहा हजार रुपयांची वाढ झाल्यानं लोकांनी आता सोने खरेदीचा हात आखडता घेतला आहे. मुंबईत जिथं दररोज साधारण तीनशे ग्रॅम सोन्याची विक्री व्हायची, तिथं आता ती शंभर ग्रॅमवर आली आहे. मंदी आणि एकूण अनिश्‍चितता, त्यात सोन्याच्या भावातील वाढीमुळं आता उलाढालीत बर्‍यापैकी फरक झाला आहे. सोने आणि हिरे घडविणारे कारागीर गरीब कुटुंबातील असतात. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तसंच पश्‍चिम बंगालमधील कारागीरांचा त्यात समावेश असतो. अवाढव्य खर्च करून उभारलेल्या सुवर्ण पेढयाकडं ग्राहकच फिरकत नसल्यानं सेल्समन हातातवर हात ठेवून बसलेले दिसतात. व्यवस्थापन खर्च झेपत नसल्यानं आता विक्रेते आणि कारागीरांच्या चहाच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. सुवर्ण कारागीरांना स्वस्तात भोजन देणार्‍या अनेक संस्था आहेत. त्यांच्याकडं आता एकदाच जेवणाची मागणी नोंदविली जात आहे. वडापाव किंवा अन्य तत्सम काहीतरी खावून कारागीर आली वेळ भागवून नेत आहेत. एकट्या मुंबईत तीन लाख कारागीर आहेत. हॉलमार्क, घडणावळ करणारे तसंच सेल्समनच्या पोटावर सोन्याच्या झळाळीनं पाय आणला आहे. विश्‍वासू सेल्समन मिळणं अवघड असतं. त्यामुळं मंदीच्या काळात सेल्समनला सांभाळावं लागतं. सोन्याच्या भावाच्या दहा टक्के घडणावळ दागिन्यांवर घेतली जात असली, तरी कारागीरांना मात्र दहा ग्रॅमच्या दागिन्यांच्या घडणावळीसाठी पाचशेच रुपये मिळतात. दागिन्यांची मागणीच मंदावली असल्यानं आता त्यांच्या उत्पन्नात घट झाल्यानं खर्चात कपात करण्याशिवाय त्यांच्यापुढं पर्याय राहिलेला नाही. ही स्थिती एकट्या मुंबईपुरती मर्यादित नाही, तर देशभर अशीच स्थिती आहे. प्राचीनकाळापासून जगप्रसिद्ध असलेली नाशिक घाटाची चांदीची भांडी आणि वस्तू बनवणारे शहरातील 45 पैकी 40 कारखाने आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कराचा वाढीव बोजा, चांदीचे वाढलेले दर आणि बाजारातील मंदीचा फटका या उद्योगातील सुमारे दोन हजारांपैकी एक हजार कारागीरांना बसला आहे. अनेकांच्या हाताला कामच उरलेलं नसल्यानं दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची भ्रांत त्यांच्यासमोर आहे.

जवळपास 350 वर्षांपूर्वी मराठा कालखंडात नाशिक घाटाची चांदीची भांडी बनवण्याचं काम सुरू झालं. शुद्ध चांदीचा वापर करून नाशिक घाटाची भांडी घडवली जातात. शहरात 40 ते 45 असे कारखाने असून दोन हजार मजूर त्यात काम करत; मात्र आज जवळपास 40 कारखाने बंद पडण्याच्या स्थितीपर्यंत आले आहे. नोटाबंदी, जीएसटीचा सामना करत असतानाच चांदीचे भाव प्रति किलोला 47,500 रुपयांपर्यंत गेल्यानं ऐन हंगामात अनेक कारागीर बसून आहेत. चांदी खरेदी करताना आता तीन टक्के जीएसटी भरावा लागतो. जीएसटीपूर्वी 1.2 % व्हॅट होता. आयात शुल्कातही विद्यमान सरकारनं वाढ केली. पूर्वी 10 टक्के आयात शुल्क मोजावे लागत होते. ते आता 12.5 टक्के आकारले जातो. म्हणजे सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी 15.5 टक्के कर द्यावा लागतो. सोन्या-चांदीचे आणि हिर्‍याचे वाढलेले भाव आणि त्यावरचा कर पाहिला, तर आता ग्राहकांनी खरेदीकडं पाठ फिरवावी लागली. त्याचा फटका कारागीरांना बसला आहे.
या कारागीरांसाठी सरकारनं मूलभूत योजना राबवाव्यात किंवा कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून द्यावं. स्वतंत्र क्लस्टर करावं, अशा मागण्या पुढं आल्या आहेत. नाशिकची चांदी भांडी आणि कलाकुसर प्रसिद्ध आहे; मात्र आजपर्यंत कधीही न पाहिलेली मंदी पाहायला मिळत आहे. हे असंच चालू राहिलं, तर कालांतरानं ही कारागिरी लुप्त होण्याची भीती आहे. नाशकात पाच हजारांच्या आसपास बंगाली कारागीर सोन्याची कलाकुसर, घडणावळीसाठी प्रसिद्ध आहेत; मात्र सोन्याचे दरही 40 हजारांच्या आसपास गेल्यानु या कारागीरांचं कामही घटलं आहे, काहींकडं तर कामच नाही, त्यामुळं त्यांनी मूळ गावचा रस्ता धरल्याचं चित्र आहे. सोन्याचांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली. त्यामुळं ग्राहकांची संख्या घटली आहे. औरंगाबादेत अनेक वर्षांपासून सराफा बाजारात जवळपास 800 कारागीर काम करत होते. आता फक्त 200 उरले आहेत. ते गावाकडे परतले आहेत. 70 टक्के कारागीरांच्या हाताला काम नसल्यानं ते गावाकडे जात आहेत. सणाच्या तोंडावर सोने-चांदीची बाजारपेठ बहरते. साडेतीन मुहूर्तांना आता सुरुवात होणार आहे. अशा वेळी सोन्याच्या गगनाला भिडणार्‍या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. एकीकडं पाऊस नाही, दुसरीकडं किमतीत वाढ व घटलेली मागणी यामुळे स्थलांतराचीच वेळ आली आहे.

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कावर अडीच टक्के अधिकचा कर लावला आहे. त्यामुळं देशातील सोने आणि हिरे व्यापारी संकटात येऊन याक्षेत्रात असलेले लाखो रोजगार कमी होतील अशी भीती मुंबईतील सोने व्यापार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारकडून सध्या दहा टक्के आयातकर आकारला जात आहे. त्यात तीन टक्के जीएसटी वाढल्याने 13 टक्के आयात कर झाला आहे. परिणामी सोने व्यापार्‍यांना हा सर्व कर द्यावा लागतो. आणि आता सरकारनं वाढवलेल्या अडीच टक्के करामुळं सोने व्यापार्‍यांचे कंबरडं मोडणार आहे. देशातील सोन्याची बाजारपेठ अडचणीत आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भाव 30 हजार प्रति तोळे सुरू आहे. भारतात या आयात करामुळं सोन्याचा भाव 40 हजारांवर गेला आहे. त्यामुळं भारतीय बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची स्मगलिंग होऊ शकते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात धुमाकूळ माजेल आणि सोने व्यापारी अडचणीत येतील. आज देशभरातील सोने आणि हिरे व्यापाराच्या क्षेत्रात सहा कोटीहून अधिक रोजगार आहेत. यात कारागीर, मालक, सेल्समन, डायमंड मर्चंट, दुकानदार, होलसेल बाजाराचे प्रमुख आदी असंख्य व्यक्तींचा समावेश आहे. सरकारनं वाढवलेल्या करामुळे या क्षेत्रात असलेल्या कामगारांवर प्रचंड परिणाम झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नारीला ’नारी-नारायणी’ अशी उपमा दिली. त्याच नारी - नारायणीसाठी जे सोनं दागिना असतो ,त्याला महाग करून सरकारनं महिलांवरही अन्याय केला आहे. सरकारनं या करांचा पुनर्विचार करावा. अन्यथा, यापुढं देशातील सर्वसामान्य माणूस अथवा इतर लोक सोन्याच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी करतील आणि त्यामुळं हे क्षेत्र अडचणीत सापडेल. ‘हिर्‍यांची नगरी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुरतलाही ‘मंदी’ची नजर लागली आहे. गेल्या वर्षभरात हिर्‍यांचे अनेक छोटे-मोठे उद्योग बंद होताना दिसत आहेत. त्यामुळं जवळपास 15 हजार कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. आता संसार कसा सुरू राहणार, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा आहे. सुरतमध्ये स्थायिक झालेले अनेक कारागीर आपापल्या गावी परतत आहेत.

सुरतचा हिरे व्यापार जगभर प्रसिद्ध आहे. इथं जगातील 10 पैंकी नऊ हिरे तयार होतात. देश-विदेशातील लोक हिर्‍यांच्या व्यापारासाठी सुरतमध्ये दाखल होतात. त्यामुळंच इथल्या हजारो कारागीरांचे संसार उभे राहिले आहेत; परंतु अमेरिका आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम या उद्योगावर झाला आहे. त्यामुळं हा उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मंदीमुळं हिर्‍यांना उठाव नसल्यानं हिर्‍यांचे हजारो व्यापारी बेकार झाले आहेत. हिरे कारागीरांच्या संघ कार्यालयानं दिलेल्या आकड्यांनुसार, गेल्या वर्षभरात 1500 हिरे व्यापारी बेरोजगार झाले आहेत. सध्या केवळ 10 टक्के हिरे कारागीर त्यांच्याकडं आपलं नाव दाखल करण्यासाठी येतात. त्यामुळं हे प्रकरण गंभीरतेनं घेत संघानं मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. हिर्‍यांच्या एका-एका कंपनीत जवळपास 200 कारागीर कामं करून आपला उदरनिर्वाह करतात; परंतु या कंपन्याच बंद पडल्याने ते बेरोजगार झाले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास एक हजारांहून जास्त कंपन्या बंद पडल्या आहेत.
चीन-अमेरिका युद्ध आणि चीननं सोन्याच्या सुरू केलेल्या खरेदीमुळं जगातील बहुतांश देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्यांची खरेदी करीत असून त्यामुळं भाववाढ झाली आहे. युद्ध टाळणं आणि सोन्याची अतिरिक्त खरेदी थांबवणं हा उपाय आहे; परंतु तो आपल्या हातात नसल्यानं किमान जीएसटीसह अन्य कर मिळून जो साडेपंधरा टक्के कर भरावा लागतो, तो सहा टक्क्यांवर आणण्याची मागणी केली जात आहे; परंतु सरकारचं आधीच घटलेलं महसुली उत्पन्न लक्षात घेता सरकार हा उपाय करेल का, याबाबत साशंकता आहे.