Breaking News

हर्षवर्धन पाटील यांचा आज भाजपत प्रवेश

पुणे / प्रतिनिधी
राज्यातील काँग्रेसचे ज्येेष्ठ व दिग्गज नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता ते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत.

इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील नाराज होते. मागील विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भारणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळावी, असा आग्रह पाटील यांचा होता. आघाडीच्या जागा वाटपातही या जागेवर चर्चा सुरू असल्याची चर्चा होती; मात्र काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. लोकसभेला आम्हाला मदत करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते; मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला विश्‍वासघात केला असे म्हणत त्यांनी टीका केली होती. आत्तापर्यंत आपण संयमाने वागलो; मात्र यापुढील काळात आक्रमकपणा बघाच, असा इशारा देत भाजप प्रवेशाचे संकेत मेळाव्यातच दिले होते.

हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे त्यांनी सलग चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग तीन वेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. युती सरकारच्या काळात ते मंत्री होते. त्यानंतर राज्यात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्येही 14 वर्ष मंत्रिपदावर होते. पाटील यांनी सहा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे.