Breaking News

स्टीव्ह स्मिथचे कारकीर्दीतील तिसरे द्विशतक

अ‍ॅशेस मालिकेतील चौथी कसोटी : ऑस्टे्रलियाचा पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित

मँचेस्टर
स्टीव्ह स्मिथचे जिगरबाज, द्विशतक आणि त्याने कर्णधार टीम पेनसमवेत साकारलेली अभेद्य शतकी भागीदारी, यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध येथील चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी 8 बाद 497 धावांवर आपला डाव घोषित केला.
3 बाद 170 धावसंख्येवरून खेळाला सुरुवात झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडचा (19) बळी गमावला. त्यानंतर मॅथ्यू वेडलाही (16) मोठी खेळी करण्यात अपयश आले. 5 बाद 224 अशी स्थिती असताना स्मिथने कर्णधार टिम पेनच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गडयासाठी 145 धावांची अभेद्य शतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले. क्रेग ओव्हरटर्नने पेनला 58 धावांवर माघारी  पाठवून इंग्लंडला सहावे यश मिळवून दिले. परंतु स्मिथने मात्र शतकानंतरही समाधान न बाळगता द्विशतच्या दिशेने कूच केली. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर दोन धावा काढून स्मिथने द्विशतक साकारले. विशेष म्हणजे तिन्ही द्विशतके त्याने इंग्लंडविरुद्धच झळकावली असून या मालिकेतही आता त्याच्या नावावर तीन शतके जमा आहेत. अखेरीस जो रूटने स्मिथच्या मॅरेथॉन खेळीला लगाम लावला. 24 चौकार व 2 षटकारांसह 211 धावा काढून स्मिथ माघारी परतला.
या मालिकेत लॉर्ड्सवर जोफ्रा आर्चरच्या बाऊन्सरवर जायबंदी झालेल्या स्टीव्ह स्मिथला नंतर तिसऱया कसोटीत खेळता आले नव्हते. पण, येथे चौथ्या कसोटीत जोरदार पुनरागमन करताना अगदी जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवरही सावध पण, आत्मविश्‍वासपूर्ण फलंदाजी साकारली. यजमान इंग्लिश संघातर्फे स्टुअर्ट ब्रॉड सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 23 षटकात 74 धावात 3 बळी घेतले. याशिवाय, लीच व ओव्हर्टन यांना प्रत्येकी 1 बळी घेता आला. पहिल्या टप्प्यात स्टुअर्ट ब्रॉडने ट्रव्हिस हेडला 19 धावांवर पायचीत केले. पण, तो बाद झाल्यानंतर स्मिथने मॅथ्यू वेडच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलिया पुन्हा ट्रकवर परतणार, अशी चिन्हे असतानाच मॅथ्यू वेडची एकाग्रता भंगली आणि एका खराब फटक्यावर त्याने इंग्लंडला आपली विकेट बहाल केली. जॅक लीचला मिडविकेटवरुन पिटाळून देण्याचा त्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि जो रुटने लाँगऑनवर शानदार झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. वेडला 16 धावांवर समाधान मानावे लागले. एका बाजूने ठरावीक अंतराने सहकारी फलंदाज बाद होत असले तरी स्मिथने मात्र एक बाजू लावून धरत आपले द्विशतक पूर्ण केले.


संक्षिप्त धावफलक  
ऑस्ट्रेलिया : 126 षटकांत 8 बाद 497 डाव घोषित (स्टिव्हस्मिथ 211, मार्नस लबूशेन 67, टिम पेन 58; स्टुअर्ट ब्रॉड 3/57).