Breaking News

महाविद्यालयातील मोफत क्लास ही विद्यार्थ्यांसाठी बहुमोल गोष्ट

अहमदनगर/प्रतिनिधी
“12 वीत चांगले मार्कस् पडल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्‍न जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी व पालकांना पडतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसाठी नीट, जेईई, एमएचटी-सीईटी या सारख्या अनेक परीक्षांचे मार्ग करिअरसाठी खुले असतात. यासाठी 11 वीतच विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करावी. या सर्व परीक्षांच्या मार्गदर्शन व अभ्यासासाठी सारडा महाविद्यालयाने मोफत क्लासची सुविधा उपलब्ध करून महत्त्वाचा जो उपक्रम राबविला आहे, तो विद्यार्थ्यांसाठी बहुमोल आहे. या सुविधेचा स्वीकार करा. लायब्ररीमधील उपलब्ध पुस्तकांचा लाभ घ्यावा’’,असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक व्याख्याते प्रा.विजय भोसले यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालयातील 11 वी व 12 वी शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित या विषयांचे जेईई, निट, एमएच-सीईटी या वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी विनामूल्य विशेष मार्गदर्शन वर्ग व त्यासंबधीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी महाविद्यालयात नव्याने उभारलेल्या इमारतीमधील वर्गखोल्यांचे उद्घाटन प्रा.विजय भोसले यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक होते. या कार्यक्रमास मंडळाचे सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी सचिव सुनील रामदासी, सारडा महाविद्यालयाचे चेअरमन अ‍ॅड.अनंत फडणीस, सुमतीलाल कोठारी, जगदीश झालानी, मधुसूदन सारडा, बी.यू.कुलकर्णी, प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, उपप्राचार्य प्रा.डी.आर.जाधव आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.शिरीष मोडक म्हणाले, “वैद्यकीय व अभियांत्रिकी या महत्त्वाच्या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विनामूल्य क्लास सुरु करणारे महाराष्ट्रातील व नगरमधील सारडा महाविद्यालय एकमेव आहे. या परीक्षांसाठी सारडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळून स्पर्धेच्या युगात पुढे येण्यासाठी हे विनामूल्य वर्ग सुरु केले आहेत.’’
संजय जोशी म्हणाले, “सारडा महाविद्यालयाच्या या नव्या अभिनव उपक्रमामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सुविधेमुळे पालकांची व विद्यार्थ्यांची खाजगी क्लासच्या माध्यमातून होणारी लूट थांबणार आहे.’’
प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी स्वागत केले. स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा.अविनाश झरेकर यांनी प्रास्तविक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.गिरीश पाखरे, अतुल कुलकर्णी व प्राध्यापकांनी परीश्रम घेतले. प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उपप्राचार्य डी.आर.जाधव यांनी मानले. यावेळी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित विभागातील तज्ज्ञ प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.