Breaking News

युतीच्या घटक पक्षांमध्येच जागांसाठी रस्सीखेच

मुंबई / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते. एवढा कमी वेळ शिल्लक असताना भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपावरून संदिग्धता आहे. त्यातच आता युतीच्या घटकपक्षांमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप-शिवसेना युतीमध्ये घटक पक्षांना 18 जागा सोडण्यात येणार आहेत. यात महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्रामचा समावेश आहे. या चार घटक पक्षांना सोडलेल्या 18 जागांपैकी 12 जागा आपल्या पक्षाला मिळणार असल्याचा दावा जानकर यांनी केला आहे, तर आठवले यांनी दहा जागा आपल्या पक्षाला मिळायला हव्यात, असा आग्रह धरला आहे.

जानकरांचा दावा खरा मानला तर उरलेल्या सहा जागा इतर तीन पक्षांसाठी उरतात. त्यामुळे जानकारांच्या या दाव्यावरून घटक पक्षात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जाणकारांच्या या दाव्याबाबत विचारले असता खोत यांनी बोलण्यास नकार दिला आहे. भाजपचे सध्या 122 आमदार तर शिवसेनेचे 63 आमदार आणि मित्रपक्षांच्या 18 जागा याची बेरीज केली तर ती होते 203, एकूण 288 जागांमधून 203 वजा केले तर उरतात 85 जागा. या 85 जागांचे निम्मे केले तर 42.5 म्हणजेच साधारण 43 जागा होतात. आता यातील भाजपच्या वाट्याला 122 आणि 43 म्हणजेच 165 आणि शिवसेनेच्या 63 आणि 43 अशा 106 जागा होतात; पण शिवसेनेने 110 पेक्षा कमी जागा स्वीकारायला नकार दिला आहे.  

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणार्‍या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरतील. त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जाते आहे; मात्र या दोन्ही पक्षांचे नेते अजूनही युती होणारच असल्याचा दावा करत आहेत.

भाजपला स्वबळावर बहुतमाचा अंदाज
भाजपकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास पक्षाला 160 जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष पुढे आला होता, तर महायुतीला विधानसभेच्या 288 पैकी 229 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.