Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आश्‍चर्यकारक रेल्वेस्टेशनांत समावेश

मुंबई / प्रतिनिधी
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी या रेल्वे स्थानकाचा जगातील सर्वात आश्‍चर्यकारक रेल्वे स्थानकांच्या यादीत समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच 132 वर्षे पूर्ण झालेल्या सीएसएमटी स्थानकाने जगातील सर्वात आश्‍चर्यकारक स्थानकांच्या यादीमध्ये थेट दुसरा क्रमांक पटकावला आहे. मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील दहा आश्‍चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली आहे. न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल टर्मिनलने या यादीमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे, तर लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल स्थानक तिसर्‍या क्रमांकावर आहे. सीएसएमटी हे स्थानक म्हणजे वास्तूकलेचा अद्भूत नमूना असून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेले हे एकमेव स्थानक आहे अशा शब्दांमध्ये या संकेतस्थळाने सीएसएमटीचा गौरव केला आहे. हे भारतातील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक असून दररोज तीन दशलक्ष प्रवासी येथून प्रवास करतात. मुघल आणि व्हिक्टोरियन गॉथिकच्या वास्तूकलेवर आधारित हे स्थानक फेड्रीक विल्यम स्टिव्हन्स यांनी बांधले असून या स्थानकाचे नाव आधी व्हिक्टोरिया टर्मिनस असे होते; पण नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले.