Breaking News

अजित पवारांसह पन्नास नेत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम

गुन्हा दाखल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावरचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले

नवीदिल्ली
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या सहा विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयाचे  न्या . अरुणकुमार मिश्रा व न्या . एम.आर . शहा यांनीफेटाळल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे आदींसह जवळपास 50 नेते अडचणीत सापडले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला वसंतराव शिंदे, अमरसिंह पंडित, सिद्रामाप्पा आलुरे, आनंदराव अडसूळ, नीलेश सरनाईक, रामप्रसाद बोर्डीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 22 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने याबाबत आदेश देताना पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला होता. उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या मतांचा परिणाम होऊ न देता तपास पूर्ण करावा अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे. राज्याची शिखर बँक म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केली. राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था आणि व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्जे दिल्याने बँक अडचणीत सापडली आणि त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बँकेला भाग पडले.

या संदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही गुन्हा  नोंदवण्यात आला नाही, असा आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची विनंती माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली होती. याविषयी उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी महिन्यात अरोरा यांचा जबाब नोंदवून घेतला; मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला जाब विचारला होता. तेव्हा अरोरा यांच्या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याने गुन्हा  नोंदवण्यात आला नाही, असे उत्तर आर्थिक गुन्हे शाखेने दिले होते. त्यानंतर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने 31 जुलै रोजी याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला होता. तो 22 ऑगस्ट जाहीर करताना खंडपीठाने याचिकादारांची विनंती मान्य करत पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.