Breaking News

मोदींनी वेचला कचरा, केली गोसेवा

ओम, गायच्या उच्चाराने काहींना करंट; मोदी यांची विरोधकांवर टीका

मथुरा
उत्तर प्रदेशातील मथुरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुभत्या गायी, म्हशींना गंभीर आजारांपासून मुक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 13 हजार पाचशे कोटी रुपयांच्या लसीकरण योजनेचे उद्घाटन केले. मोदी यांनी या कार्यक्रमाची सुरुवात गोसेवेने केली. या वेळी कचरा व्यवस्थापनाशी संबंधित महिलांसोबत कचरा वेचून मोदी यांनी लोकांना प्लॅस्टिकचा उपयोग न करण्याचे आवाहन केले. याबरोबरच त्यांनी एकदाच वापरायच्या प्लॅस्टिकविरोधी मोहिमेचेही उदघाटन केले.

मोदी यांनी या वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विद्यापीठ आणि संशोधन केंद्राच्या कामाची पाहणी केली. या वेळी इथे आयोजित गुरांच्या जत्रेचे उद्घाटनही केले. त्यानंतर त्यांनी पशुपालन आणि पशुपालनाशी संबंधित विभागांच्या विविध योजनांचाही आढावा घेतला. मोदी यांनी कचरा आणि भंगारापासून प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार करणार्‍या मथुरेतील महिलांची भेट घेतली. या महिलांनी पंतप्रधानांना प्लॅस्टिक व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकही दाखवले. या वेळी पंतप्रधानांनी प्लॅस्टिक आणि कचरा वेगळा करणार्‍या मशीनचाही उपयोग केला. या जत्रेत मथुरा-वृंदावन नगरच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनाचा स्टॉलही लावण्यात आला आहे.

ओम हा शब्द कानावर पडताच काही लोकांचे कान उभे राहतात. काही लोकांनी ‘गाय’ हा शब्द ऐकला तर त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना करंट लागतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. देश 16व्या, 17 व्या शतकात गेला आहे असेच या लोकांना वाटते असे सांगताना, याच लोकांनी देशाचे वाटोळे केल्याचा घणाघात मोदी यांनी केला आहे.

मथुरेत विरोधकांवर टीका करताना मोदी यांनी दहशतवादावरही भाष्य केले. अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, की दहशतवाद ही एक जागतिक समस्या बनली आहे. आज दहशतवाद ही एक विचारधाराच बनली आहे. या दहशतवादाची मुळे आपल्या शेजारीच वाढत आहेत. आम्ही याचा मोठ्या ताकदीने मुकाबला करत आहोत आणि पुढेही करत राहू. दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे आणि आम्ही ते करूनही दाखवले, असेही मोदी पुढे म्हणाले.

स्वच्छता ही सेवा अभियानाची सुरुवात
या वर्षी 2 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येकाने आपली घरे, आपली कार्यालये, आपली कार्यक्षेत्रे सिंगल यूज प्लॅस्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही मोदी यांनी या वेळी केले. आज स्वच्छता ही सेवा अभियान सुरू झाले असून राष्ट्रीय प्राणी रोग प्रतिबंधक कार्यक्रमदेखील सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधी यांचे हे 150वे प्रेरणावर्ष आहे. स्वच्छता ही सेवा या मागे हीच भावना आहे. आजपासून सुरू होत असलेले हे अभियान विशेषत: प्लॅस्टिक कचर्‍यापासून मुक्तीला समर्पित करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.