Breaking News

दहशतवादाचे केंद्र पाकिस्तानमध्येच

संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेत भारताचा आक्रमक पवित्रा


जिनिव्हा/वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकारी परिषदेत जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्‍या पाकिस्तानला भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत असून भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशीर पाऊल उचलले आहे, असे विजय ठाकूर सिंह यांनी सांगितले. ‘‘पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू असून काश्मीरबाबतच्या त्याच्या प्रचारातील खोटेपणाला जग भुललेले नाही,’’ अशी घणाघाती टीका भारताने केली आहे.

 भारताच्या परराष्ट्र सचिव विजय ठाकूर सिंग यांनी पाकिस्तानने काश्मीरवरून भारताविरोधात केलेल्या आरोपांचा स्पष्ट शब्दांत समाचार घेताना सांगितले की, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा ठेवायचा की नाही, हा निर्णय घेण्याचा आम्हाला सार्वभौम अधिकार आहे. आमच्या संसदेने तो निर्णय घेतला आहे. त्यात कोणत्याही अन्य देशाला हस्तक्षेप करण्यास वावच नाही.

 जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक तऱ्हेने सामाजिक आणि आर्थिक विकास घडावा, यासाठी देशाने लोकशाही मार्गाने हा निर्णय घेतला आहे. काश्मिरी जनतेला सर्वाधिक झळ दहशतवादानेच बसली असून पाकिस्तानच्या चिथावणीने हा दहशतवाद फोफावत असल्याचे अनेकवार सिद्ध झाले आहे. खरे पाहता संपूर्ण जगानेच संघटितपणे दहशतवादाचा कणा मोडण्याची गरज आहे, असेही सिंग यांनी सांगितले.