Breaking News

भारताकडून काश्मीरमध्ये नरसंहार

पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत आरोप

Mehmood Qureshi
न्यूयार्क
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाकडून निराशा झालेल्या पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर भारताविरोधात 115 पानांचे डॉजिअर सादर करत भारतावर खोटे आरोप लावले आहेत. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासमोर आपली बाजू मांडली. भारताने मानवाधिकारांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नसल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर बोलताना काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताविरोधात तथ्यहीन आरोप केले आहेत. काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी संयुक्त तपास समितीची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी या वेळी त्यांनी केली आहे. कुरैशी यांनी भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत त्यामध्ये काश्मीरमध्ये मुस्लिमांना जबरदस्ती अल्पसंख्यांक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, असे म्हटले आहे. काश्मीरमध्ये स्मशानशांतता असून, तिथे भारताकडून नरसंहार केला जात आहे, असा आरोप या वेळी त्यांनी केला. जम्मू काश्मीरध्ये मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमध्ये सात ते 10 लाख सैनिक तैनात असून जगातील सर्वांत मोठा कैदखाना असल्याची टीका कुरैशी यांनी केली आहे. काश्मीरमध्ये सहा हजारांहून जास्त नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना अटक करण्यात आले असल्याचा आरोप या वेळी त्यांनी केला. या वेळी त्यांनी रोहिंग्या आणि गुजरात दंगलीचा उल्लेख केला. काश्मीरमध्ये पेलेट गनचा वापर बंद करण्यात यावा आणि कर्फ्यू हटवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे केली.

सत्य बाहेर न येण्यासाठी आटापिटा
भारत काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाला असल्याचा दावा करते. मग, भारत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, संस्थांना जाण्याची परवानगी का देत नाही? सत्य जगासमोर येऊ नये, यासाठी भारताचा आटापिटा चालू असल्याचा कांगावा त्यांनी केला.