Breaking News

काँग्रेसचा ‘हात’ सोडताच ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर ?

Urmila Matondkar
मुंबई
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार्‍या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ह्या पराभूत झाल्या होत्या. पक्षातील अंतर्गत कलहामुळे माझा पराभव झाल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मातोंडकर ह्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी आल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर उर्मिला शिवबंधन बांधणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. आणि याला निमित्त ठरलं ते शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उर्मिलाला केलेला फोन. गेल्याच आठवड्यात उर्मिला मातोंडकरने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. पक्षांतर्गत राजकारण सोडवण्यासाठी आपला वापर झाल्याचा आरोप उर्मिलाने केला होता. त्यावेळी पक्षांतराबाबत उर्मिलाने मौन बाळगलं होतं. मात्र येत्या आठवड्यात उर्मिला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांच्याशी आपले आणि शिवसेनेचे कौटुंबिक स्नेहसंबंध आहेत. त्यांच्याशी फोनवरुन झालेल्या संवादाचा राजकीय हेतू जोडू नका, असं आवाहन करत उर्मिला यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली असली, तरी त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याबाबत काहीच बोललो नसल्याचा दावा नार्वेकरांनी केला आहे. उर्मिला मातोंडकर यांचे मराठी कलाकार म्हणून मातोश्रीशी चांगले संबध आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मात्र, ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या मैत्रीपूर्ण संबधामुळे शिवसेनेवर त्यांनी कधीही टीका केली नव्हती. मातोश्रीनेही उर्मिला मातोंडकर यांच्याशी मराठी लेक म्हणूनच मैत्रीचे संबध कायम ठेवले होते. त्यामुळे आता हेच संबंध राजकीय होणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.