Breaking News

चंद्र तो राहिला दूर...!

कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगाला पहिल्या प्रयत्नांत यश येत नसते. प्रयोगामागून प्रयोग करावे लागतात. चुका झाल्या, तर त्या दुरुस्त कराव्या लागतात. तेव्हा कुठे यश येते. अपयश आले, म्हणून निराश व्हायचे नसते. दहा-दहा वर्षे एखाद्या मोहिमेवर काम केले आणि यश हाती आले आहे, असे वाटत असतानाच तो प्रयोग अपयशी ठरावा, याचे दुःख मोठे असतेच. यशाचे अनेक धनी असतात. अपयशाचे कुणीच नसते. वैज्ञानिकांबाबत तसे म्हणता येत नाही. संपूर्ण देशाने त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. त्यांना आत्मविश्‍वास दिला पाहिजे, तरच त्यांना नवी उभारी येईल. उमेद वाढेल. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे म्हणतात, ते उगीच नाही.
गेल्या 11 वर्षांपासून चंद्रावर यान उतरवण्यासाठी जे कष्ट घेतले, ते फलद्रुप होत आहेत, असे वाटत असतानाच विक्रम या लँडरचा संपर्क तुटला आणि ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांना भावना अनावर झाल्या. यश अवघ्या 69 सेकंदावर असताना त्याने हुलकावणी दिल्यानंतर जी अवस्था होते, तीच अवस्था शास्त्रज्ञांची झाली आहे. ‘इस्त्रो’चे अध्यक्ष के. सीवन यांनी एक दिवस अगोदर जी भीती व्यक्त केली होती आणि जो कसोटीचा क्षण असल्याचे सांगितले होते, ती भीती खरी ठरली. चांद्रयान-2 साठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले होते. अखेरचा ‘पंधरा मिनिटांचा थरार’ म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या ’विक्रम’चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता. रात्री एक वाजून 45 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचे अंतर जसजसे कमी होत होते, तसे सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता. ‘इस्त्रो’ सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेवून होते. एक वाजून 53 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते; मात्र चांद्रयान अवघे 2.1 किलोमीटरवर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्‍वास रोखला गेला. या वेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. ‘जीवनात चढ-उतार येत असतात. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही विज्ञानाची आणि पर्यायाने देशाची सेवा केली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी खडतर मेहनत घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही यशस्वी कामगिरी केली आहे. धीर सोडू नका. संपर्क तुटला म्हणून खचून जाऊ नका. तुम्ही केलेले काम छोटे नाही,’ अशा शब्दांत त्यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. ते आवश्यकच होते.

‘चांद्रयान-2’चा चंद्राच्या दिशेने प्रवास 22 जुलैला सुरू झाला, तेव्हापासून आतापर्यंतचे सर्व टप्पे व्यवस्थित पार पडले होते. 2016 मध्ये रशियाने लँडर देण्यात असमर्थता दर्शवल्यावर तीन वर्षांच्या विक्रमी काळात ‘इस्त्रो’ने स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लँडर आणि रोव्हर विकसित केले. ‘चांद्रयान-2’च्या रूपाने ‘इस्त्रो’ने भारतीय भूमीवरून आतापर्यंतचे सर्वाधिक वजनाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि कोणताही अनुभव नसताना पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने लँडर आणि रोव्हरला चांद्रभूमीवर उतरवण्यासाठी प्रयत्न केले. मोदी ‘इस्त्रो’चे प्रमुख के. सिवन यांना भेटत असताना त्यांना जवळ घेत मिठी मारली. या वेळी सद्गदीत झालेल्या के. सिवन यांना अश्रू अनावर झाले. ‘इस्त्रो’ची ही सर्वात अवघड आणि महत्वाकांक्षी मोहीम होती. या मोहिमेत चंद्रावरच्या माती आणि वातावरणाचा अभ्यास केला जाणार होता. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ‘इस्त्रो’चे संशोधक दहा वर्षांपासून अथक प्रयत्न करत होते. चांद्रयान 2 या मोहिमेसाठी कोट्यवधींचा खर्च झाला आहे; मात्र इतर देशांच्या तुलनेत हा खर्च अगदीच नगन्य आहे. चांद्रयान-2 चा एकूण खर्च मध्यतंरी आलेल्या हॉलिवूडच्या अ‍ॅव्हेंजर्स या चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा कमीच आहे. ‘अँव्हेजर्स-एंडगेम’ चित्रपटाच्या निर्मितीला तब्बल दोन हजार 443 कोटी रुपये लागले होते; मात्र चांद्रयान-2 या संपूर्ण प्रकल्पावर फक्त 978 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. खर्च किती झाला, यापेक्षा दहा वर्षेे एखाद्या उद्दिष्टाचा ध्यास घेऊन त्यावर अहोरात्र काम केले आणि आता उद्दिष्ट गाठण्याचा क्षण जवळ आला असताना सारेच मुसळ केरात जावे, तसे झाले. अपेक्षाभंगाचे हे मोठे दुःख शास्त्रज्ञांना आहे. ‘चांद्रयान-2’ मोहीम यशस्वी झाली असती, तर चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला असता. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरवले आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्तम काम करणार्‍या आणि सर्व देशाच्या नजरा ज्याच्याकडे लागल्या होत्या, तो लँडर ‘विक्रम’ सध्या बेपत्ता आहे. ‘विक्रम’चे नेमके  काय झाले, याबद्दल विविध तर्क व्यक्त करण्यात येत आहेत; मात्र ही मोहीम शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणे हेही एक मोठे यश असल्याचे शास्रज्ञांचे मत आहे. यातून ‘इस्त्रो’ला अनेक गोष्टी शिकता येणार आहेत.

विक्रमचा संपर्क का तुटला असावा, याबाबत तीन शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्या आहेत. वेग कमी करत असताना लँडर ‘विक्रम’मध्ये अचानक तांत्रिक दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपर्क तुटू शकतो. नंतर काही वेळाने पुन्हा संपर्क प्रस्थापित केला जाऊ शकतो; मात्र आता त्याची शक्यता खूपच कमी आहे. लँडर ‘विक्रम’ चंद्रावर उतरली असावे; मात्र त्याचा संपर्क तुटला असावा अशीही शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे तो संपर्क तुटला असावा. असे झाले असेल तर मात्र पुन्हा संपर्क करणे अवघड आहे.
लँडर ‘विक्रम’ शेवटच्या टप्प्यात खाली येत असताना चंद्रावर आदळून ते नष्ट झाले असेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावेळचा त्याचा वेग आणि तिथली परिस्थिती यामुळे असे होण्याची शक्यता जास्त आहे. या तीन शक्यता असल्या, तरी त्या प्राथमिक माहितीवर आधारीत आहेत. जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ‘विक्रम’कडून आलेल्या माहितीचे सखोल विश्‍लेषण केले जात नाही तोपर्यंत अंतिम निष्कर्ष काढता येत नसल्याचे ‘इस्त्रो’च्या तज्ज्ञांचे मत आहे. ही मोहीम यशस्वी ठरली असती तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला असता. ‘इस्त्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी ज्या 15 मिनिटांचा उल्लेख केला होता आणि ज्याला ‘15 मिनिट ऑफ टेरर’ असे संबोधले होते, हा प्रवास चार टप्प्यांचा होता. पहिला टप्प्यात विक्रम 30 किलोमीचर ते 7.4 किलोमीटरपर्यंत आले. त्यासाठी 10 मिनिटे लागली. त्यानंतर ‘इस्त्रो’चे नियंत्रण राहिले नाही. दुसर्‍या टप्प्यात लँडर 7.5 ते पाच किलोमीटरपर्यंत लँडर उतरले. त्यासाठी 38 सेकंद लागले. यादरम्यान विक्रमचे चार इंजिन चालू झाले. यामुळे वेग ताशी 550 ते 330 किलोमीटर झाला. तिसर्‍या टप्प्यात पाच किलोमीटरवरून उतरताना संपर्क तुटला. त्यासाठी 89 सेकंद लागणार होते. यानंतर काहीही माहिती मिळाली नाही, तेथूनच कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.