Breaking News

पाकिस्तान सरकारवर पाणी विकण्याची वेळ!

इस्लामाबाद
देशामधील आर्थिक मंदीमध्ये अधिक खर्च होऊ नये, म्हणून पाकिस्तान सरकारने थेट पाण्याच्या बाटल्यांची विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात बाटलीबंद पाणी विकणार्‍या कंपन्या नैसर्गिक पाण्याऐवजी कृत्रिम पाणी विकत असल्याचे सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी सरकारच्या माध्यमातून बाजारात आणल्या जाणार्‍या या पाण्याच्या बाटल्यांना ‘पिण्यासाठी सुरक्षित पाणी’ असे म्हटले आहे. ‘आम्ही एक रुपये प्रती लीटर दराने या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहोत. सध्या बाजारातील मिनरल वॉटरच्या कंपन्या आहेत, त्यांच्यापेक्षा पाण्याचा हा दर खूपच स्वस्त आहे’, असे फवाद यांनी सांगितले आहे.
जुलै महिन्यामध्ये पाकिस्तान जलसंपदा संशोधन परिषदेने (पीसीआरडब्यूआर) संसदीय समितीसमोर देशातील बाटलीबंद पाण्यासंदर्भातील अहवाल सादर केला होता. त्यामध्ये पाकिस्तानमधील कंपन्या बाटल्यांमधून नैसर्गिक पाणी विकण्याऐवजी कृत्रिम पाणी विकत असल्याचे नमूद करण्यात आले होते. यानंतर सरकारने स्वस्तात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
साधेपणाने कारभार करत जास्तीत जास्त पैशांची बचत करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या धोरणाअंतर्गत या पाण्याच्या बाटल्यांचा लवकरच वापर आणि विक्री सुरू केली जाणार असल्याचे फवाद यांनी सांगितले. सर्वात आधी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपतीभवन आणि संसदेमध्ये या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातील. हळूहळू सर्व सामान्यांसाठी हे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून तीन वर्षांमध्ये पाकिस्तानला 600 कोटी डॉलर्सची मदत करणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणार असेल, तरच ही मदत केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमांनुसार सरकारी खर्चामध्ये वेगवेगळ्या उपाय योजनांच्या माध्यमातून कपात करण्यास सांगण्यात आले आहे.

इलेक्ट्रीक मोटारसायकल आणि रिक्षाही सुरू करणार
पाकिस्तान लवकरच इलेक्ट्रीक बॅटरीवर चालणार्‍या मोटरसायकल आणि रिक्षा सेवा सुरू करणार असल्याचे फवाद यांनी सांगितले. देशामध्ये इंधनावर होणारा खर्च कमी करण्याचाच हा एक प्रयत्न असणार आहे.