Breaking News

नऊ हजार घरांची आठ दिवसांत सोडत?

नवी मुंबई 
 विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या महिन्यात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत बांधण्यात येणार्‍या 94 हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 7 हजार 905 घरांची व जुन्या सोडतीतील शिल्लक 1344 घरे अशा एकूण नऊ हजार 249 घरांची अर्ज विक्री सिडको पुढील आठवडयात 9 अथवा 10 सप्टेंबर रोजी काढणार आहे. या सोडतीतील घरांची किमत कमीत कमी 19 लाख रुपये तर जास्तीत जास्त 29 लाखपर्यंत असण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या 2022 पर्यंत सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत राज्य सरकारला पाच लाख घरांचे लक्ष देण्यात आले आहे. त्यातील 1 लाख 10 हजार घरांच्या उभारणीचे काम सिडकोने हाती घेतले आहे. गेल्या वर्षी 14 हजार 738 घरांची सोडत आणि बांधणी एकाच वेळी सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशाने सिडकोने आणखी 94 हजार परिवहन आधारित गृहसंकुलाचा आराखडा तयार केला आहे. ही योजना अगोदर 89 हजार घरांची होती. वाढीव चटई निर्देशांकामुळे या घरांची संख्या पाच हजाराने वाढून ती 94 हजार झाली आहे. बस आगार, ट्रक टर्मिनल आणि रेल्वे स्थानकांबाहेर वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर सिडको परिवहन आधारित घरे बांधणार आहे. यात जवळपास 56 हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असणार असून उर्वरित 38 हजार घरे ही आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी राखीव आहेत.
वाशी, खारघर, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल, द्रोणागिरी, खारकोपर, बामणडोंगरी उलवा या नवी मुंबईच्या दक्षिण भागात पुढील पाच ते सहा वर्षांत बांधण्यात येणार्‍या या घरांच्या पहिल्या टप्प्यातील घरांची अर्ज विक्री पुढील आठवडयात सोमवारी 9 अथवा 10 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळची प्रतीक्षा सिडको प्रशासन करीत आहे. या अर्ज विक्रीसाठी लागणारी सर्व तयारी सिडकोने केली असून पंधरा हजार घरांच्या वेळी वापरण्यात येणारे तज्ज्ञप्रणाली वापरण्यात येणार आहे.  सिडकोच्या 89 हजार घरांच्या महागृहनिर्मितीत आणखी पाच हजार घरांची भर पडून ही सोडत 94 हजार घरांसाठी होणार आहे. तळोजामधील सेक्टर 34 व 36 मध्ये बांधली जाणारी ही पहिल्या टप्प्यातील घरे आर्थिकदृष्टया दुर्बळ घटकासाठी 2,897 असून अल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार 8 घरांची अर्ज विक्री पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. त्यानंतर एक महिन्यानंतर हे अर्ज भरून सादर केल्यानंतर सोडत काढली जाणार आहे. सोडतीला आचारसंहितेचा अडथळा येणार नाही.
घरांची किंमतीत दोन लाखांची वाढ
सिडकोच्या या घरांची किमत किती असेल हा सर्वात मोठा उत्सुकतेचा प्रश्‍न मानला जातो. गेल्या वर्षी सिडको आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 16 लाखांत घर विकले होते, ही किमत आता दोन लाखांनी वाढणार आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी 28 ते 30 लाखांपर्यंतची किमत राहणार आहे. आर्थिक मंदीचा बांधकाम व्यवसायालाही मोठा फटका आहे. या पार्श्‍वभूमीवर महागृहनिर्मितीला कसा प्रतिसाद मिळतो याकडे विकासक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रत्येक सोडतीला वेगळा अर्जाची गरज नाही
या सोडतीत सिडको काही पर्याय खुले ठेवणार आहे. यात जुन्या घरांच्या सोडतीत एखाद्या ग्राहकाला घर मिळाले नाही तर त्याला 94 हजार घरांच्या महागृहनिर्मितीत दावा घरता येणार आहे, पण त्यासाठी त्याने अर्ज भरताना तसा पर्याय निवडणे आवश्यक आहे. हाच प्रकार पुढील टप्प्यातील सोडतींच्या वेळी स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक सोडतीला वेगळा अर्ज करावा लागणार नाही, पण त्यासाठी विविध मुदत निश्‍चित केली जाणार आहे.
सिडकोच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सोडतीसाठी पणन विभागाची तयारी गेली अनेक माहिने सुरू आहे. पंधरा हजार घरांच्या सोडती वेळी याची रंगीत तालीम झालेली आहे. त्यामुळे वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर ही अर्ज विक्री व सोडत अधिक लोकभिमुख आणि पारदर्शक करण्यावर सिडकोचा भर राहणार आहे.
- लक्ष्मीकांत डावरे, पणन विभाग, सिडको.