Breaking News

हरयाणात बसप स्वबळावर

चंदीगड
हरयाणातील आगामी विधानसभा निवडणुकांअगोदर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षात युती होण्याची चिन्हे दिसत असतानाच, आगामी विधानसभा निवडणुकीत बसपने स्वबळाचा नारा देऊन काँग्रेसबरोबर युती करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस व बसपच्या युतीच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.

बसपचे राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी या दोन्ही पक्षांची युती होणार नसल्याची माहिती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बसप हरयाणातील सर्वच 90 जागांवर उमेदवार देणार आहे. त्याचबरोबर आम्ही काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
हरयाणा काँग्रेसच्या अध्यक्ष कुमारी शैलजा आणि हरयाणा काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी आज बसप प्रमुख मायावती यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

हरयाणात याच वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग लवकरच हरयाणासह झारखंड व महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत हरयाणातील 90 पैकी 47 जागांवर भाजपला विजय मिळाला होता, तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ 15 व इंडियन नॅशनल लोकदलास 19 जागा मिळाल्या होत्या.