Breaking News

'सहकारा'मुळे तालुक्याची अर्थव्यवस्था भक्कम - आ.थोरात

संगमनेर/प्रतिनिधी

 तालुक्यातील शेतकरी व नागरिकांची आर्थिक कामधेनू असणार्‍या अमृतवाहिनी बँकेची अर्थ व्यवस्था मजबूत आहे. बॅकेने सभासदांचा मोठा विश्‍वास संपादन केला आहे. कर्ज घेणे, गरज असली तरी थकबाकी भरणे कर्तव्य आहे. संगमनेर तालुका हा सहकारामुळे प्रगतीपथावर असून सहकारी पतसंस्थामधून सुमारे १ हजार 400 कोटींच्या ठेवी असून अमृतवाहिनी बँकेसह सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था भक्कम झाली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँकेची 37 वी व हरिश्‍चंद्र फेडरेशन आणि गरुड कुक्कट पालन या सहकारी संस्थांच्या एकत्रित वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित होते. व्यासपीठावर शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, अ‍ॅड.माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी कोल्हापूर,सांगली,सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अमृतवाहिनी बँकेच्यावतीने 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी आमदार थोरात यांच्याकडे देण्यात आला.तसेच संगमनेर प्रवरा काठच्या नुकसान झालेल्या कुटुंबामधील विद्यार्थ्यांना गणवेश,दप्तर,वह्या,पुस्तके यांसह शालेय साहित्य देण्यात आले.

  पुढे बोलताना आ. थोरात म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीवर येथील सहकार उभा आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न केला आहे. भंडारदर्‍याचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करुन 30 टक्के पाणी मिळविले. दुष्काळी भागासाठी निळवंडे पूर्ण केले.तालुक्यात पाईप लाईनचे जाळे निर्माण झाल्याने समृध्दी आली. यामध्ये हरिश्‍चंद्र फेडरेशन संस्थेचे मोठे काम राहिले आहे. तसेच अमृतवाहिनी बँकेने अनेक कुटुंबांना मदत करतांना सभासद,ठेवीदार,कर्जदार यांचा मोठा विश्‍वास निर्माण केला आहे.