Breaking News

लोकप्रतिनिधींकडे विकासकामे करण्याची मानसिकता नाही : काळे

कोपरगाव/ता.प्रतिनिधी 
 कोपरगावच्या अपेक्षा अतिशय माफक आहेत. विकासाचे कामे करायला नुसते सत्ता किंवा पद असणे जरुरी नाही. त्यासाठी विकासकामे करण्याची मानसिकता असावी लागते. मात्र, सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडे विकासकामे करण्याची मानसिकता नसल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, रस्ते व आरोग्याचे प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मला साथ द्या, तुमचे प्रश्‍न सोडवून दाखवितो, असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.
 आशुतोष काळे मित्र मंडळाच्यावतीने आयोजित आशुतोष काळे यांच्या समाजकार्यावर आधारित प्रश्‍न मंजुषा स्पर्धेच्या सोडती प्रसंगी ते बोलत होते.
 यावेळी आशुतोष काळे म्हणाले की, माजी आ.अशोकराव काळे यांच्याकडे विकासकामे करण्याची मानसिकता असल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचे आ. असतानांही त्यांनी कोपरगाव शहर व तालुक्यासाठी केलेली भरीव विकासकामे नागरिकांच्या समोर आहेत. कोपरगावच्या नागरिकांना नियमित पाणी पुरवठ्यासाठी साठवण तलाव अपुरे पडत असल्यामुळे चार नंबर साठवण तलावाच्या विस्तारीकरणासाठी त्यांनी 2 कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु शहराच्या नागरिकांना पाणी मिळू नये, अशी मानसिकता असलेल्या सत्ताधार्‍यांमुळे हा निधी परत गेला. चार नंबर साठवण तलावाच्या बाबतीत जे घडलं तेच पाच नंबर साठवण तलावाच्या बाबतीत घडत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
  यावेळी आशुतोष काळे यांच्या समाजकार्यावर आधारित प्रश्‍न मंजुषा स्पर्धेचा लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या रुपये एक लाख रोख रक्कमेच्या भाग्यवान विजेत्या संजयनगर येथील मालनबाई डोळस या ठरल्या. द्वितीय क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपयाचे भाग्यवान बापू वाघमारे ठरले. तर तृतीय क्रमांकाचे रुपये एकवीस हजाराचे बक्षिस बालाजी आंगण या भागातील आदित्य खेमनर हे मानकरी ठरले आहे. सर्व भाग्यवान विजेत्यांना आशुतोष काळे, चैताली काळे, पद्माकांत कुदळे यांच्या हस्ते रोख रक्कमेचे बक्षीस देण्यात आले.
 याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, अजीज शेख, सुनील शिलेदार, हिरामण कहार, रमेश गवळी, नवाज कुरेशी उपस्थित होते.