Breaking News

काँग्रेस नेत्याच्या अटकेवर भाजपचे मुख्यमंत्री नाराज

शिवकुमार यांच्या अटकेवरून तापले राजकारण; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही होणार अटक


बंगळूर, नैनिताल 
कथित आर्थिक गैरव्यवहारावरून कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक नेते डी. के. शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्या अटकेवरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे भाजपचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनीही शिवकुमार यांच्या अटकेवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना सीबीआय अटक करण्याची शक्यता आहे. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या पाठोपाठ केंद्रीय तपास यंत्रणांनी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांना अटक केली. कर्नाटक विधानसभेवर सातवेळा निवडून गेलेले शिवकुमार यांची गेले पाच दिवस ‘ईडी’कडून चौकशी सुरू होती. करचुकवेगिरी आणि हवाला प्रकरणी प्राप्तिकर विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून गेल्या सप्टेंबरमध्ये ‘ईडी’ने त्यांच्यासह त्यांचा सहकारी एस. के. शर्मा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

शिवकुमार यांना अटक केल्यानंतर कर्नाटक काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने कर्नाटक बंदची हाक दिली असून, राजकीय सूडातून ही कारवाई होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. येदियुरप्पा यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवकुमार यांच्या अटकेमुळे मला आनंद झालेला नाही. शिवकुमार या प्रकरणातून लवकर बाहेर यावेत, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी कुणाचाही तिरस्कार केलेला नाही. तसेच कुणाचे वाईट व्हावे असा विचारही केलेला नाही. अशा प्रकरणांमध्ये कायदा त्याचे काम करतो, असे येदियुरप्पा म्हणाले आहेत.
नैनितालः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कर्नाटकमधील ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचा आणखी एक नेता ‘सीबीआय’च्या रडारवर आहे. 2016 च्या कथित स्टिंग व्हिडिओप्रकरणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरुद्ध सीबीआय गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. 2016 मध्ये सत्तेत राहण्यासाठी आणि सत्तेविरुद्ध बंड करणार्‍या आमदारांना रावत यांनी पैशांची लाच देऊ केली होती. उत्तराखंड उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी तपास पथकाने माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध स्टिंग व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती न्यायालयात दिली आहे. 2016 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर हा कथित व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत रावत सत्ता टिकून ठेवण्यासाठी व भाजपत गेलेल्या बंडखोर आमदारांचा पुन्हा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. 

रावत यांनी आरोप फेटाळले
आपल्याविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप हरीश रावत यांनी फेटाळले आहेत. काही लोक मला जाणीवपूर्वक बदनाम करीत आहेत; परंतु मी त्यांच्या आरोपाला बळी पडणार नाही. उलट मी या सर्वांविरुद्ध लढेन, असे रावत म्हणाले.