Breaking News

‘कत्तल की रात’ मिरवणुकीत पोलिसांचा लाठीमार

अहमदनगर/ प्रतिनिधी
‘मोहरम’मध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या ‘कत्तल की रात’ मिरवणुकीला गालबोट लागले. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या टारगटांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे कोठला परिसरात तणावाचे वातावरण होते.
छोटे इमाम यांची सवारी कोठला येथून बाहेर पडली होती. काही टारगट तरुणांनी परिसरात उच्छाद मांडला होता. पळापळी करत होते. यामुळे उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. उच्छाद घातलेल्या टारगटांना रोखण्यासाठी पोलिस पुढे सरसावले. यावेळी ते पोलिसांच्या अंगावर धावून आले. पोलिस उपअधीक्षक राकेश मानगावकर हे त्यावेळी पुढे होते. टारगटांचा एक गट त्यांच्या अंगावर धावून आला. त्याचवेळेस उपअधीक्षक माणगावकर यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांनी टारगटांना रोखले. त्याचवेळी टारगटांनी पोलिसांवर हल्ला केला. हा हल्ला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारमुळे कोठला परिसरात चांगलीच पळापळ झाली. पोलिसांवर हल्ला करणार्‍या टारगटांना ताब्यात घेण्यात आले. कोठला समितीने पोलिसांच्या लाठीचार्जवर नाराजी व्यक्तकेली. पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप यावेळी पदाधिकार्‍यांनी केला.