Breaking News

नदीजोड प्रकल्प आराखडासाठी पाच महिन्यात निविदा - गिरीश महाजन

Girish Mahajan
जळगाव
उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याला सुजलाम सुफलाम बनविणार्या नदीजोड प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून येत्या पाच महिन्यात या प्रकल्पाची निविदा काढण्यात येणार असल्याची  माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सांगितले.
येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यासाठी महाजन यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.  यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दरवर्षी दुषकाळी अनुदानावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत आहे. यावर कायमस्वरुपी उपाय योजन्यासाठी  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महत्वाकांक्षी असलेला नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पामुळे तापी व गोदावरी खोर्यातील समुद्राला वाहून जाणारे पाणी  नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून अडवून ते उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात वळविण्याचे नियोजन आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी राज्यात 32 लाख हेक्टरपर्यंत सिंचन झाले होते. परंतु आता 42 लाख हेक्टर सिंचनाखाली आले आहे. राज्यातील शासन दुषकाळी भागातील शेवटच्या लोकांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी काम करीत असल्याचे सांगून महाजन म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील जुने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे. गेल्या पाच वर्षात राज्यातील 185 सिंचन प्रकल्प पूर्ण झाले आहे. राज्यातील धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने त्यांचा उपयुक्त साठा कमी झाला आहे. उजनी  धरणातही मोठया प्रमाणात गाळ साठला आहे. हा गाळ डिसेंट्रीग योजना राबवून काढण्यात येणार असून तो शेतकर्यांना मोफत देण्यात येणार आहे. तर यामधील वाळू वेगळी करुन तिचा उपयोग विविध प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे. जळगाव व भुसावळ शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास कळविण्यात येईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, जळगाव शहर महानगरपालिकेच्या गाळे भाड्याने देण्याच्या विषयही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. तसेच जळगाव येथी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भुमिपूजन लवकरच करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.