Breaking News

मोदी यांना न घाबरणार्‍या नेत्याची देशाला गरज

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा घरचा आहेर; अप्रत्यक्ष निशाणा

नवी दिल्ली
भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधानांसोबत जो निर्भयपणे बोलू शकेल, जो तत्त्वांच्या आधारे पंतप्रधानांशी चर्चा करेल तसेच कोणतीही चिंता न करता आपले विचार व्यक्त करू शकेल, अशा नेत्याची देशाला आवश्यकता आहे’, असे विधान जोशी यांनी केलं आहे. 
माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत बोलत असताना मुरली मनोहर जोशी यांनी हे विधान केले. या शोकसभेत बोलताना जोशी म्हणाले, की निर्भिडपणे आपले विचार व्यक्त करेल अशा नेत्याची देशाला गरज आहे. त्याने मांडलेले विचार ऐकून पंतप्रधान खूश होतील की नाराज? याची चिंता त्याला नसावी.
रेड्डी यांचे हैदराबादमध्ये 28 जुलैला निधन झाले. 90च्या दशकातील त्यांच्यासोबतच्या आठवणींना जोशी यांनी उजाळा दिला. जोशी म्हणाले, की रेड्डी आपल्या अखेरच्या काळातही आपले विचार, मते व्यक्त करत होते. त्यांनी प्रत्येक स्तरावर आपले मत मांडले असून आपल्या मुद्यांसोबत कधीही तडजोड केली नाही. 
या शोकसभेमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू, मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे नेते सीताराम येचुरी, काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.