Breaking News

गणेशोत्सवात विघ्न वीजवाहक तारांचे

वसई 
 महावितरणतर्फे वसईत वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे सुरू आहे. मात्र या भूमिगत केलेल्या वीजवाहक तारा सध्या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती आहे. येथील विद्युतयंत्रणा बळकट करताना त्यावर होणारे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांतर्फे होत आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात वीजवाहक तारांचे विघ्न आले असून, यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे.
वसई-विरार विभागात महावितरणची वीजवितरण व्यवस्था भूमिगत नाही. त्यामुळे वीजवाहक तारा तुटत असतात. त्याचा फटका परिसरातील हजारो वीजग्राहकांना बसत असतो. त्यावर उपाय म्हणून महावितरणने वसईतील वीजवितरण व्यवस्था भूमिगत करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र जूनपासून हे काम पावसाळा असल्याने बंद आहे. वसई गाव ते वसई रोड परिसरात एप्रिल-मे महिन्यात युद्धपातळीवर हे काम महावितरणने नेमलेल्या ठेकेदारातर्फे हाती घेण्यात आले होते. यावेळी रस्त्यावर 1 ते 2 फूट खड्डे खणून केबल टाकण्याचे काम केले आहे. मात्र या ठिकाणी अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप वसईतील नगरसेविका विद्या पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी या केबल टाकण्याचे काम करण्यात आले आहे, त्या ठिकाणी रस्त्यावर अनेकदा अपघातदेखील झाले आहेत. या ठिकाणी असलेल्या भूमिगत केबल सध्या बाहेर आल्या आहेत. ज्या ठिकाणी बाहेर आहेत त्या ठिकाणचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे.
दुसरीकडे ज्या भागात या वीजवाहक तारा भूमिगत करण्यात आल्या आहेत, त्या रस्त्याची डागडुजीदेखील योग्य प्रमाणावर न केल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवासी संकेत राऊत यांनी केला आहे. माणिकपूर येथील रास्ता पूर्णतः यामुळे खराब झाला असून अर्धा रस्त्यावर डांबरीकरण आणि अर्ध्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. यामध्ये समानता नसल्याने रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे.
महावितरणकडून दाखल नाही
वसई रोड ते वसई गाव हा मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच गणेशोत्सव आल्याने नेहमीपेक्षा रहदारी वाढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वीजवाहक तारांच्या या केबलमुळे आणि त्यावर होणारे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने येथून प्रवास करणार्‍या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत महावितरण अधिकार्‍यांना तक्रार केली असता त्यांनी दाखल घेतली नसल्याचा आरोप नगरसेविका पाटील यांनी केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी लेखी मागणी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वसई इंजिनीअर यांच्याकडे पुन्हा केली आहे.