Breaking News

तोडफोड केलेल्या नगरसेवकांचा शोध सुरू

भाईंदर
 बुधवारी मीरा-भाईंदर महानगरपालिकेत झालेल्या तोडफोड प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शिवसेनेच्या 17 नगरसेवकांना बुधवारी सायंकाळपर्यंत अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणाचा तपास सुरू असून नगरसेवकांचा शोध चालू असल्याची माहिती भाईंदर पोलिसांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा विषय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यास नकार देण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी महापौर दालन आणि स्थायी समिती सभागृहात तोडफोड केली होती.
त्यानंतर महापालिका सचिवांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शिवसेनेचे 17 नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी सकाळी नगरसेवकांना अटक करून न्यायालयापुढे हजर करणे अपेक्षित होते.
मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत एकाही नगरसेवकाला अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणी भाईंदर पोलिसांकडे विचारणा केली असता प्रकरणाचा तपास चालू आहे आणि नगरसेवकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.