Breaking News

दिल्लीत शीख समाजाची निदर्शने;

इम्रान खान यांचा पुतळा जाळला

नवीदिल्ली
पाकिस्तनातील हिंदू तरुणींना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जात असल्याने, या विरोधात दिल्लीत शीख समाजाच्यावतीने निदर्शने केली जात आहेत. तसेच, पाकिस्तानात असलेल्या शीख कुटुंबीयांच्या सुरक्षेचीदेखील मागणी केली जात आहे. पाकिस्तानात एका शीख तरुणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिला धर्मांतर करायला लावले व त्यानंतर तिचा विवाह लावून देण्यात आल्याची घटना घडली आहे.

धर्मांतर करून विवाह करण्याची घटना होऊन दोन-तीन दिवस होत नाहीत, तोच रविवारी महाविद्यालयात जाताना आणखी एका हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचेही धर्मांतर करण्यात आल्याची घटना घडली. या तरुणीचा देखील जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आल्याने भारतीय नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभूमीवर संतप्त झालेल्या शीख बांधवांनी निदर्शनाच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा जाळला.

शीख समाजाचे नागरिक पाकिस्तानच्या उच्च आयोगास एक निवेदन सादर करण्याच्या प्रयत्नात होते. या वेळी त्यांना अडवण्यात आल्याने जमाव आणखीच संतापला व आंदोलनास हिंसक वळण लागले. या वेळी आंदोलकांकडून पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.