Breaking News

युवकांनो संवादयात्री ते संवादसाधक प्रवास करा : श्रीकांत भारतीय

मुंबई
महाराष्ट्रातील युवक युवतींना आपल्यातील वक्तृत्व कौशल्यामुळे आपले विचार आणि मते मांडण्याची संधी मिळाली.चांगले वक्तृत्व म्हणजे काय तर तर जेथे भावब्रम्ह, शब्दब्रम्ह आणि नादब्रम्ह याची एकत्रित उपासना होते. त्यामुळे युवकांनी संवादयात्री ते संवादसाधक असा प्रवास करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी सांगितले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राज्य युवा संसद व युवा संमेलनाचे आयोजन विधीमंडळात करण्यात आले आहे. दोन दिवसीय चालणार्‍या या संमेलनात आज सकाळी ’युवा - जागर महाराष्ट्रावर बोलू काही’ या उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बखुरीया, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापक राजश्री वराडे, श्रीपाद ढेकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत बोलताना भारतीय म्हणाले की, राज्य युवा संसद व युवा संमेलनाच्या माध्यमातून राज्यातील 108 युवक युवतींना युवा ससद होण्याची संधी मिळाली आहे. आणि भविष्यात अशाच उपक्रमातून महाराष्ट्राचे विधीमंडळात नेतृत्व करणारे संसद मिळतील अशी अपेक्षा आहे. चांगले वक्तृत्व त्यालाच करता येते जो दुप्पट ऐकतो आणि निमपट बोलतो. समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असताना समाजाच्या हदयाची स्पंदने ऐकायला शिकणे आवश्यक आहे. क्रीडा आयुक्त बखुरीया म्हणाले की, या उपक्रमामध्ये तरुणींचा सहभाग अधिक असून येणार्‍या काळात महिलांचे प्रतिनिधीत्व या क्षेत्रात अधिक दिसून येईल. तरुणांमधील वक्तृत्व या गुणाला वाव मिळण्यासाठी हा उपक्रम निश्‍चित महत्वाची भूमिका पार पाडेल. उपसचिव पवार यांनी अशा पध्दतीचे संमेलन आयोजित करण्यामागची राज्य शासनाची भूमिका, अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा मिळालेला सहभाग, तालुका ते राज्यस्तर असे निवडण्यात आलेले तरुण तरुणी याबाबत माहिती दिली.  या संमेलनाचे उद्घाटन संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे आणि शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. तर संमेलनाच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्रावर बोलू काही या उपक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी बेल वाजवून दोन दिवसीय संमेलनाचा प्रारंभ केला. राज्यामध्ये ‘युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही’ या उपक्रमांतर्गत कनिष्ठ महाविद्यालय व गट स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, जिल्हास्तरावर युवा संसद व राज्यस्तरावर युवा संसद व युवा संमेलन आयोजित करण्यात आले. राज्य युवा संसदेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून तीन युवा याप्रमाणे एकूण 108 युवक व 36 व्यवस्थापक सहभागी झाले आहेत. तसेच युवा संमेलनासाठी 1000 युवा सहभागी झाले आहेत.