Breaking News

नवलखा यांना 15 ऑक्टोबपर्यंत अटकेपासून संरक्षण

नवी दिल्ली
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते, त्याला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने 15 ऑक्टोबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणी नवलखा यांच्याविरुद्ध तपास सुरू असून त्यादरम्यान जे पुरावे गोळा करण्यात आले ते न्यायालयात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले. आपल्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या नकाराला नवलखा यांनी आव्हान दिले असून त्याबाबत सुनावणी घेण्याचे न्या. अरुण मिश्रा आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाने मान्य केले आणि सुनावणी 15 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरण आणि माओवाद्यांशी लागेबांधे असल्याबद्दल न्यायालयाने नवलखा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास नकार देताना या प्रकरणात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे नमूद केले होते.