Breaking News

नालासोपार्‍यात 19 हजार बोगस मतदार?

Voters
वसई
 इतर मतदारसंघांतील मतदारांची नावे नालासोपारा मतदारसंघात असल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीने केली होती. मात्र तपासात बोगस मतदार नसल्याचे पालघर जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. तसेच, बोगस मतदारांची यादी असल्यास ती सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार बविआने शोध घेऊन इतर मतदारसंघांत नावे असलेल्या 19 हजारांहून अधिक मतदारांची नावे नालासोपार्‍यातही असल्याचे पुरावे सोमवारी पत्रकार परिषदेत सादर केले.
पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदार नालासोपारा मतदारसंघात आहेत. पाच लाखांहून अधिक मतदार येथे असून त्यातील एक लाखाच्या आसपास मतदारांची नावे बोगस असल्याचा आरोप करत ‘बविआ’ने याबाबत पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार नोंदवली होती. याबाबतच्या चौकशीत बोगस मतदार आढळून आले नाहीत, मात्र नोंदणी करताना सारखी असणारी काही नावे आढळून आली असून ती सहा हजारांच्या आसपास असल्याचे जिल्हाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. बोगस मतदार आढळल्यास ती यादी सादर करण्याचे आवाहन ’बविआ’ला केले असल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बोलताना सांगितले होते.
जिल्हाधिकार्‍यांच्या या आवाहनानंतर नालासोपारा मतदारसंघात मतदारांची संख्या कशी वाढली, याची शोधमोहीम बहुजन विकास आघाडीने सुरू केली. त्यासाठी गेले काही दिवस मतदारसंघातील याद्यांची अन्य मतदारसंघातील याद्यांशी पडताळणी करण्यात येत होती. यामध्ये त्यांना तब्ब्ल 19 हजारांहून अधिक मतदार बोगस असल्याचे पुरावे आढळून आल्याची माहिती, आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदारांची पूर्ण नावे, त्यांचे वय व लिंग एकसारखे असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. तसेच, 500 मतदार ओळखपत्र क्रमांकांच्या छाननीमध्ये एकाच व्यक्तीकडे दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील मतदार ओळखपत्रे असल्याचे आढळून आल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. तसेच, ही यादी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केली असून याबाबत तक्रार नोंदविल्याचे त्यांनी म्हटले. या मतदारयादीतील मतदारांची पूर्ण नावे, त्यांचे वय व लिंग एकसारखे असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. तसेच, 500 मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या छाननीमध्ये एकाच व्यक्तीकडे दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतील मतदार ओळखपत्रे असल्याचे आढळून आल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. तसेच ही यादी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केली असून याबाबत तक्रार नोंदविल्याचे त्यांनी म्हटले.

हे बोगस मतदार आले कुठून?

प्रामुख्याने गेल्या चार महिन्यांत अंधेरी, जोगेश्‍वरी, विलेपार्ले, कांदिवली या परिसरातील मतदार नालासोपारा मतदारसंघात नोंदविण्यात आले आहेत. नालासोपारा मतदारसंघातील मतदारांची वाढ संशयास्पद वाटल्याने आम्ही सर्व याद्या पडताळण्यास सुरुवात केली. अंधेरीमधील 17 हजार नावे मागील काही दिवसांत नालासोपारामध्ये नोंदवली गेली. जी नावे नालासोपारा मतदारसंघात आहेत, त्याच व्यक्ती अन्य मतदारसंघात आहेत. अन्य मतदारसंघात त्यांचे पूर्ण पत्ते आहेत, मात्र नालासोपार्‍यात अर्धवट पत्ता नोंदविण्यात आल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

मतदार तपासण्यासाठी निरीक्षकाची नेमणूक

नालासोपार्‍यात एकच मतदार दोन ठिकाणी दोन वेळा मतदान करणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. नालासोपार्‍यातील सर्वच मतदान केंद्रावर ‘वेबकास्टिंग’ करणार आहोत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असून मायक्रो ऑब्झर्व्हर (निरीक्षक) यांची नेमणूक करण्यात येईल. यांसह वेगळा निरीक्षकदेखील नेमणार आहोत. मतदार दोन ठिकाणी मतदान करताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असतात. त्यांना बूथ लेव्हल एजंट नेमायचे असतात. त्यामुळे तुमच्या पक्षाचे लोक आमच्या लोकांबरोबर जाऊन आक्षेप घेऊ शकतात. मात्र आज जी यादी त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली, ती मी अजून पाहिलेली नसून कदाचित नालासोपारा येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ती आली असावी, ते पडताळून सांगतो, असे पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी म्हटले आहे.