Breaking News

माजी उपमुख्यमंत्र्याच्या घरावर आयकरचा छापा, चार कोटी 25 लाख जप्त

G parmeshwara
कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्‍वरा आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या अनेक ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापे टाकले जात असून यावेळी चार कोटींहून जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणांची तपासणी करण्यात आलेली असून यावेळी चार कोटी 25 लाखांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. जी परमेश्‍वरा यांच्याशी संबंधित एकूण 30 जागांवर छापेमारी करण्यात आली. शुक्रवारी सकाळीदेखील आयकर विभागाकडून तपासणी सुरु होती. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी सुरु असल्याचं अधिकार्‍याने सांगितलं आहे.

काँग्रस नेते परमेश्‍वरा आणि माजी खासदार आर एल जलप्पा यांच्याशी संबंधित ठिकाणांची तपासणी करण्यासाठी 300 हून अधिक आयकर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आयकर विभागाला मेडिकलच्या जागा अपात्र विद्यार्थ्यांना 50 ते 60 लाखांमध्ये विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हे छापे टाकण्यात आले आहेत. तपासादरम्यान आयकर विभागाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि वैद्यकीय प्रवेशात घोटाळा झाल्याचं सिद्द करणारी काही कागदपत्रं सापडली आहेत.

परमेश्‍वरा यांच्या भावाचा मुलगा आनंग आणि सिद्धार्थ मेडिकल कॉलेजची आज आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे. हे कॉलेज परमेश्‍वरा यांच्या ट्रस्टकडून चालवले जात आहे. या छापेमारीसंबंधी बोलताना जी परमेश्‍वरा यांनी गुरुवारी सांगितलं होतं की, आपल्याला छापेमारीसंबंधी कोणताही कल्पना नाही. त्यांना तपासणी करु देत. मला काहीच समस्या नाही. पण जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यात सुधारणा करण्यास तयार आहोत.

दरम्यान जलप्पा यांनी राजकीय द्वेषातून हे छापे टाकले जात असल्याचा आरोप केला आहे. परमेश्‍वरा हे कुमारस्वामी-काँग्रेसच्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. जुलै महिन्यात विधानसभेत विश्‍वास ठराव जिंकण्यात अपयशी ठरल्याने कुमारस्वामी सरकार कोसळलं होतं.