Breaking News

मेक्सिकोने 311 भारतीयांना पाठवलं स्वगृही

Mexico
नवी दिल्ली
  मेक्सिकोने 311 भारतीयांना पुन्हा माघारी पाठवलं आहे. अवैधरित्या देशात प्रवेश आणि वास्तव्य केल्याबद्दल ही कारवाई करर्ण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मेक्सिकोनं सर्व भारतीयांना दिल्लीला पाठवलं असून शुक्रवारी सकाळी बोइंग 747-400 चार्टर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. मेक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इन्स्टिटूजने याबाबतची माहिती दिली आहे. भारतात परत पाठवलेल्या लोकांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
    मेक्सिकोनं परत पाठवलेले भारतीय 60 फेडरल मायग्रेशन एजंटच्या मदतीनं तिथं पोहचले होते. चौकशीत त्यांच्याकडे कागदपत्रेही नसल्याचं समोर आलं. वास्तव्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जवळ नसतानाही संबंधित लोक गेल्या काही महिन्यांपासून तिथे होते. भारताता माघारी पाठवण्यात आलेल्या लोकांनी अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी एजंटना 25 ते 30 लाख रुपये दिल्याची धक्कादायक माहितीही सध्या समोर येत आहे. मेक्सिको बॉर्डरवरून सर्व भारतीयांना अमेरिकेच्या सीमेत प्रवेश आणि नोकरी देऊ असं एजंटने सांगितलं होतं. या रकमेत विमान प्रवास, मेक्सिकोत राहण्याची व्यवस्था, जेवणाचाही समावेश होता. तसेच एजंटनी एक आठवड्यापासून एक महिन्यापर्यंतचा वेळ अमेरिकेत प्रवेशासाठी दिला होता.
   मेक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इन्स्टिटूटनुसार, देशात वास्तव्य करण्यासाठी गरजेची असलेली कागदपत्रे माघारी पाठवण्यात आलेल्या प्रवाशांकडे नव्हती. त्या सर्वांना इमिग्रेशन अथॉरिटीसमोर हजर करण्यात आलं. मेक्सिकोनं ओकासा, बाजा कॅलिफोर्निया, वरॉक्रूझ, चिपास, सोनोरा, मेक्सिको सिटी इथं प्रशासनाच्या समोर अवैध वास्तव्य करणार्‍या प्रवाशांना हजर करण्यात आलं.
  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशार्‍यानंतर मेक्सिकोनं कठोर पावलं उचलली आहे. जून महिन्यात ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, मेक्सिकोनं त्यांच्या देशाच्या सीमेवरून अमेरिकेत घुसणार्‍या लोकांवर अंकुश ठेवावा. अन्यथा आयात होणार्‍या सर्व गोष्टींवर सीमा शुल्क आकारण्यात येईल. त्यानंतर मेक्सिकोने त्यांच्या सीमासुरक्षा वाढवण्याबाबत आणि प्रवाशांना परत पाठवण्याच्या नियमांबाबत कठोर भूमिका घेतली.