Breaking News

’ना’राजीनामा नाट्य! शिवसेनेच्या 350 पदाधिकारी, 36 नगरसेवकांचा केला जय महाराष्ट्र

नाशिक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्न करूनही, ते अपयशीच ठरले .आता कल्याणनंतर नाशिकमधलीही युती फिसकटली आहे. नाशिक पश्‍चिम मतदारसंघाची जागा भाजपला देण्यात आल्यानं शिवसैनिकांनी थेट बंडखोरीचंच हत्यार उपसलं. भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात उभे ठाकलेले शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांचा प्रचार शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी उघडपणे करत आहेत. यानंतर मंगळवारी (15 ऑक्टोबर) जवळपास 350 पदाधिकारी आणि 36 नगरसेवकांनी विलास शिंदे यांनी जाहीर समर्थन दर्शवत सामूहिक राजीनामे दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नाशिक पश्‍चिम मतदारसंघात युतीत फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील कलह वाढत आहे.

यापूर्वी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातही महायुतीत फूट पडली. शिवसेना बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील 18 नगरसेवक आणि उल्हासनगरमधील 10 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. आमच्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, अशी राजीनामा दिलेल्या नगरसेवकांचं म्हणणं होतं. दरम्यान, कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण पूर्व मतदार संघ भाजपला सोडल्याने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवकांसह पदाधिकारी नाराज झाले होते. या मतदार संघातून उल्हासनगर महापालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते धनंजय बोडारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.