Breaking News

कलम 370 रद्द करण्याचा निर्णय धाडसी: सरसंघचालक

नागपूर
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून हे सरकारने धाडसी निर्णय घेणारे सरकार असल्याचे दाखवून दिले आहे, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. दसर्‍या निमित्त नागपूर येथील विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते.

कलम 370 बद्दल बोलताना भागवत म्हणाले केंद्र सरकारने कठोर निर्णय घेऊन हे सिद्ध केले आहे की या सरकारला जनभावना कल्पना आहे. जनतेच्या अपेक्षा, त्यांच्या भावनाचा सन्मान करण्याचे साहस केवळ पुन्हा एकदा निवडूण आलेल्या सरकारमध्ये असते. 370 कलम रद्द करून सरकारने हे सिद्ध करून दाखवले. यंदाच्या वर्षी गुरु नानक यांची 550वी जयंती, महात्मा गांधी यांची 150वी जयंती आणि लोकसभा निवडणूक यासारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हे वर्ष पुढील अनेक वर्षापर्यंत लक्षात राहील, असे भागवत म्हणाले.

सागरी सुरक्षेकडे लक्ष वेधले

देशाच्या सीमेवर सुरक्षा अधिक सतर्क आहे. पण केवळ भूसीमा सुरक्षीत असून चालणार नाही तर सागरी सीमेवर देखील अधिक सतर्क राहिले पाहिजे. देशात नक्षली हिंसाचाराच्या घटनांची संख्या कमी झाली आहे. नक्षलवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. आर्थिक आघाडीवरील मंदीवर बोलताना सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि तसे निर्णय घेण्याचे धाडस सरकारने केल्याचे भागवत म्हणाले.

मॉब लिंचिंगच्या घटनांवर बोलताना भागवत म्हणाले, अशा घटनांचा आणि संघाचा काहीही संबंध नाही. मॉब लिंचिंगसारख्या घटना रोखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. कायदा तोडून हिंसाचार करण्याच्या प्रवृत्ती आपल्या समाजातील परस्पर संबंध नष्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रवृत्ती आपल्या देशाची परंपरा नाही, तसेच घटनेत देखील अशा प्रकाराला स्थान नाही. किती ही मतभेद असो. कायदा आणि राज्यघटनेच्या मर्यादेत राहिले पाहिजे आणि न्याय व्यवस्था राखली पाहिजे.