Breaking News

6 महिने आधीच हिंदू-मुस्लिम रावणाच्या मुर्तीचं नाक कापून साजरा करतात दसरा

भोपाळ
शारदीय नवरात्रौत्सव झाला की रावणाचा पुतळा जाळून विजयादशमी दसरा साजरा केला जातो. यावर्षी मंगळवारी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येईल. मात्र, मध्यप्रदेशात एक असं गाव आहे जिथं रावणाच्या मुर्तीचं नाक कापलं जातं. तेसुद्धा सहा महिने अगोदर चैत्र नवरात्रात रावणाचा अंत करण्याची परंपरा आहे. तसेच इथं हिंदुंसोबत मुस्लिम समाजही मोठ्या उत्साहानं या उत्सवात सहभागी होतो.
इंदौरपासून 190 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिकलाना गावात ही परंपरा आहे. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती भाल्याच्या मदतीने रावणाच्या मुर्तीच्या नाकावर वार करून ते कापलं जातं. नाक कापणं म्हणजे बदनामी होणं म्हणूनच रावणाचं नाक कापण्याची परंपरा जोपासली जात आहे. वाईट प्रवृत्तींना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून त्यांच्यातील अहंकार नष्ट कऱण्यासाठी कधी मागे राहू नये असं ग्रामस्थांनी म्हटलं आहे.
नवरात्रोत्सवात गावातील हनुमान मंदिरातून ढोल ताशाच्या गजरात लोक निकतात. त्यानंतर राम आणि रावणाच्या सैनिकांमध्ये युद्धाचं नाटक केलं जातं. दरम्यान, हनुमानाचा वेश करणारी व्यक्ती रावणावर गदेनं प्रहार करतो. यातून प्रतिकात्मक लंका दहन दाखवण्यात येतं. परंपरेनुसार चैत्र नवरात्र संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी रावणाच्या मुर्तीचं नाक कापून त्याचा अंत केला जातो. शारदीय नवरात्रात दसर्‍याला गावात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जात नाही. चिकलाना गावात जवळपास साडेतीन हजार लोक राहतात.