Breaking News

बीएसएनएल कर्मचार्‍यांनी दिला दिवाळीनंतर देशव्यापी संपाचा इशारा

BSNL
बीएसएनएल, एमटीएनएल या सरकरी कंपन्यांची स्थिती अद्यापही बिकट बनली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना गेल्या दोन महिन्यांचं वेतन अद्यापही मिळालेलं नाही. तसंच कर्मचार्‍यांमध्ये संतापाचं वातावरण असून वेतन न मिळाल्यास दिवाळीनंतर देशव्यापी संपाचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे.

एमटीएनएल आणि बीएसएनल कंपनीच्या कर्मचार्‍यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचं वेतन अद्यापही मिळालं नसल्याची माहिती कामगार संघटनांच्या नेत्यांकडून देण्यात आली. दिवाळीपूर्वी वेतन न मिळणं हे योग्य नाही. आम्हाला वेतन मिळालं नाही तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही पंतप्रधान कार्यालयापर्यंत हा विषय नेऊ, असा इशारा एमटीएनएल कर्मचारी संघटनेच्या धर्मराज सिंह यांनी दिला. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एमटीएनएल कर्मचार्‍यांसोबत मिळून आपण संप करणार असल्याची माहिती बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे नेते के. सबेस्टीयन यांनी दिली. तसंच कंपन्यांना नवसंजीवनी देण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे, याचीदेखील माहिती घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कर्मचार्‍यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 50 करण्यात येऊ नये, अशी मागणीही कर्मचार्‍यांनी केली आहे. याव्यतिरिक्त एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या विलिनीकरणाचाही कर्मचार्‍यांकडून विरोध करण्यात आला आहे.
आर्थिक विवंचनेपोटी कर्मचार्‍यांचे वेतनही देऊ न शकलेल्या सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंदच करण्याची सूचना सरकारला करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने सादर केलेला सार्वजनिक कंपन्यांसाठी 74,000 कोटी रुपये अर्थसाहाय्य प्रस्तावही फेटाळून अर्थ खात्याकडे लावला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) वर 95,000 कोटी रुपयांचा अर्थभार आहे. उभय कंपन्यांमध्ये 1.65 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाचा प्रस्तावही बारगळला आहे.सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंद करणे फारसे आर्थिक नुकसानीचे ठरणार नाही, असे केंद्रीय अर्थ खात्याचे म्हणणे आहे. कंपनीतील कर्मचार्‍यांना अन्यत्र सामावून घेण्याचीही सरकारची तयारी असल्याचे सांगण्यात येते.