Breaking News

माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्यांमध्ये बदल

अहमदनगर/प्रतिनिधी
“महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला विधान सभेसाठी मतदान होत असून त्याच दरम्यान माध्यमिक शाळांना सुटी लागत होती. परंतु माध्यमिक शिक्षक संघटनांच्या वतीने शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे दिवाळी सुटीत अंशत: बदल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. संचालकांनी विविध शिक्षक संघटनांच्या पत्राचा संदर्भ घेत शिक्षण संचालकांनी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकार्‍यांना दिवाळी सुटीत बदल करण्याचे आदेश दिले आहे’’, अशी माहिती शिक्षक भारतीचे नेते सुनील गाडगे यांनी दिली.
विधानसभा निवडणुका लक्षात घेता शिक्षण संचालकांनी आदेश काढून जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला दिवाळीच्या सुट्यांमध्ये बदल करण्यात यावा, असे कळविले होते. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षण अधिकारी दिलीप थोरे यांनी दिवाळीच्या सुटीत अशंत: बदल करत दिवाळीची सुटी दि.24 ऑक्टोबर ते दि.9 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी जाहिर केली आहे. तसे परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे. दि.11 नोव्हेंबरला  सर्व शाळा नियमित वेळेत सुरु होतील. सुट्यांमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी  जिल्हा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटना तसेच विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, शिक्षक भारतीचे नेते सुनील गाडगे यांनी केली. त्यानुसार दिवाळी सुट्टीत अशंत: बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य विधान सभेची निवडणुक 21 ऑक्टोबरला असल्यामुळे दिवाळी सुट्टीत बदल करण्यात आला आहे. अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, बी.आर.शिंदे, नवनाथ घोरपडे, अशोक अन्हाड, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, संजय तमनर, अशोक धनवडे, विजय लंके,  शरद धोत्रे, सुनिल जाधव, उच्च माध्यमिक अध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर आदींनी दिली.