Breaking News

भारतीय हद्दीत पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोन: दक्षतेचा इशारा

drone
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतीय हद्दीत ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंजाबमधील फिरोजपूरमधील हुसैनवाला सीमेवर सोमवारी रात्री बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानच्या बाजूनं पाच वेळा ड्रोन उडताना पाहिले. दरम्यान, याप्रकारानंतर सीमेवर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच बीएसएफलादेखील अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीएसएफने पंजाब पोलीसांना याबाबत माहिती दिली आहे. तसंच स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सीमेवर सोमवारी रात्री पाकिस्तानी ड्रोन पाच वेळा उडताना दिसले. तसंच माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार एकदा एका ड्रोनने भारतीय हद्दीतही प्रवेश केल्याचं सांगण्यात आलं. यानंतर बीएसएफच्या जवानांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर आता पंजाब पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी याचा तपास सुरू केला आहे.

बालाकोटमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांना हत्यारं पुरवण्यासाठी छोट्या ड्रोनचा वापर केला होता. यापूर्वी भारतीय हद्दीत जीपीएसच्या माध्यमातून चालणारे अनेक ड्रोन शिरले होते. त्यांच्या सहाय्याने 10 किलोंपर्यंत सामान वाहून नेता येत असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली.