Breaking News

महिलांना वैतागलेल्या पुरुषांनी केली कुंभकर्णाची पूजा

Kumbhakarna Pooja
बंगळुरु
बंगळुरुमध्ये पुरुषांच्या हक्कांसाठी लढणार्‍या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क कुंभकर्णाची पुजा केली. या पुजेमागील कारणही अगदी आगळेवेगळे आहे. अनेक महिला पुरुषांविरुद्ध खोट्या छेडछाडीच्या तक्रारी करता त्यामुळे पुरुषांची झोप उडाली आहे. याच कारणामुळे पुरुषांना चांगली झोप लागावी म्हणून त्यांनी कुंभकर्णाची पूजा केली आहे.

शहरातील जयानगर येथील टी ब्लॉकमध्ये सेव इंडियन फॅमेली फाऊंडेशनच्या (एसआयएफएफ) वतीने कुंभकर्ण पुजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पुजेमध्ये सहभागी झालेल्या पुरुषांनी कुंभकर्णाच्या कट आऊटची पुजा केली. ‘भारतामध्ये पुरुषांच्या हक्कांबद्दल बोलणारी व्यवस्था अस्तित्वात नाही. सर्वजण स्त्रीयांची बाजू घेतात,’ अशी खंत या संघटनेचे सभासद असणारे सुप्रकाश खुंतीया यांनी व्यक्त केली. सॉफ्टवेअर इंजिनियर असणार्‍या 40 वर्षीय सुप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार खोट्या आरोपांमुळे वैतागलेल्या पुरुषांनी ही पुजा केली. घरगुती हिंसाचार, घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मिळवणे, घरात होणारी भांडणे यासंदर्भातील वादाला कंटाळलेल्या पुरुषांनी ही पूजा केली असं सुप्रकाश म्हणाले.

भारतामधील न्यायव्यवस्थेची कार्यपद्धती खूपच संथ आहे. त्यामुळेच अनेक पुरुषांविरोधात दाखल करण्यात आलेली प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांची रात्रीची झोप उडाली आहे. त्यामुळेच झोपेचा देव म्हणून आम्ही कुंभकर्णाची पूजा करत आहोत. या पूजेमुळे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खोट्या तक्रारी दाखल करुन अडकवण्यात आलेल्या पुरुषांना शांत झोप लागेल अशी अपेक्षा या पुरुषांनी व्यक्त केली आहे.

देशामध्ये स्त्रीयांना पुरुषासारखे समान हक्क मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेल्या चळवळी देशातून हद्दपार व्हाव्यात यासाठी मागील महिन्यामध्ये याच संस्थेने बंगळुरुमध्ये पिंडादानाचा कार्यक्रम केला होता.