Breaking News

नवरात्र महोत्सवाची होम-हवनाने सांगता

भाविकांच्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी

पाथर्डी/प्रतिनिधी
शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता अष्टमीच्या होमाच्या पूर्णाहुतीने करण्यात आली. आज सकाळी जिल्हा न्यायाधीश क्र. 1 श्रीराम जगताप व उषा जगताप यांच्याहस्ते होमहवन करण्यात आले. दरम्यान, रविवारची सुट्टी, अष्टमी होम व नवरात्रोत्सवाची सांगता यामुळे श्री क्षेत्र मोहटादेवी येथे राज्याच्या विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांच्या गर्दीमुळे सुमारे तीन तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली. वाहतुक नियंत्रणाच्या सर्व यंत्रणा अपुर्‍या पडल्या.
आज सकाळी जिल्हा न्यायाधीश क्र.1 श्रीराम जगताप व उषा जगताप यांचे हस्ते होम हवनाला वेद मंत्रोच्चारात प्रारंभ झाला. औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश बद्री गुप्ता, मुख्य न्यायादंडाधिकारी प्रसन्न चांदगुडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे, अस्मिता भिल्लारे, दिवाणी न्यायाधीश सुशिल देशमुख, पुणे वनविभागाच्या उपवनसंरक्षक ए.लक्ष्मी उप वनसंरक्षक एम.आदर्श रेड्डी, सहायक धर्मादाय आयुक्त बानकर, पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे, जिल्हा न्यायाधीश एन.एल.काळे आदींनी भेट दिली. देवस्थान समितीचे विश्‍वस्त अ‍ॅड.प्रसन्न दराडे, भास्करराव सांगळे, राजेंद्र भंडारी, अरुण दहिफळे, गोरक्षनाथ ओव्हळ, शिवाजी पालवे, रामदास पालवे, राजेंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
वेद शास्त्र संपन्न बबन कुलकर्णी, विवेकदेवा मुळे, भूषण साकरे, नारायण कोतनकर आदींनी सर्व धार्मिक विधीचे पौरोहित्य केले. दुपारी बारा वाजता पूर्णाहुती होऊन भाविकांनी होमामध्ये नारळ अर्पण केले. दरवर्षी पोलीस प्रशासनाकडून कारेगाव मार्गे रस्ता बाहेर जाण्यासाठी तर मोहरी मार्गे रस्ता देवीकडे जाण्यासाठी अशी एकेरी वाहतूक असते. यंदा मात्र प्रशासनाचे लक्ष निवडणुकीकडे असल्याने नवरात्र उत्सवामध्ये भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. होमाच्या पूर्णाहुती नंतर पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावर उभी केलेली वाहने, पायी चालणारे भाविक, होमानंतर गावी परतणारे भाविक अशी सर्वांची एकच गर्दी होऊन वाहतूक ठप्प झाली.
आज मध्यरात्री पासून कावडीचे पाणी पडायला प्रारंभ होईल. उद्या दुपारी महापुजा होईल. मंगळवारी सिमोलंघ्घन सोहळा, बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस तर गुरुवारी कलावंताच्या हजेर्‍या व कुस्त्यांच्या हंगाम्याने यात्रेची सांगता होऊन कोजागिरी पौर्णीमेच्या महाआरतीने सर्व उत्सवांची सांगता होईल.