Breaking News

स्विस बँकांमधील खात्यांचा तपशील मिळाला

Swiss Bank
नवी दिल्ली/ बर्न
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात माहितीच्या परस्पर देवाणघेवाणीबाबत झालेल्या नव्या व्यवस्थेंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँकांमधील खात्यांबाबतच्या तपशिलाचा पहिला भाग भारताला मिळाला आहे. परदेशात दडवून ठेवल्याचा संशय असलेल्या काळ्या पैशाविरुद्धच्या लढयात हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

‘ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फर्मेशन’ (एईओआय) बाबत जागतिक निकषांच्या चौकटीत स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) स्विस बँकांतील आर्थिक खात्यांबाबत ज्या 75 देशांना माहिती दिली आहे, त्यात भारताचा समावेश आहे.

सध्या सक्रिय असलेल्या, तसेच 2018 साली बंद करण्यात आलेल्या बँक खात्यांबाबत माहिती देण्याची तरतूद असलेल्या एईओआयच्या चौकटीअन्वये स्वित्झर्लंडकडून भारताला तपशील मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर अशा प्रकारची माहिती सप्टेंबर 2020 मध्ये दिली जाईल, असे एफटीएच्या प्रवक्त्याने सांगितले.

मात्र माहितीच्या देवाणघेवाणीबाबत कडक गोपनीयता बाळगण्याची अट असून, बँक खात्यांची संख्या अथवा स्विस बँकांमध्ये भारतीय ग्राहकांची किती रक्कम आहे याबाबतचे तपशील जाहीर करण्यास एफटीएच्या अधिकार्‍यांनी नकार दिला. एफटीएने सुमारे 3.1 अब्ज आर्थिक खात्यांची माहिती भागीदार देशांना दिली आहे.