Breaking News

निवडणुकीच्या प्रचारासाठी खासगी संस्थेतील मनुष्यबळ वापरल्यास कारवाई

शेवगाव/प्रतिनीधी
विधानभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेच्या निर्देशानुसार प्रचारासाठी खासगी अनुदानित सहकारी संस्था व शिक्षण संस्थेमधील मनुष्यबळाचा संस्थाचालकांनी गैरवापर केल्यास त्यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आदेश शेवगाव-पाथर्डी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिले आहेत.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील गटविकास अधिकारी, सह निबंधक, गटशिक्षणाधिकारी यांना या बाबतचे आदेश केकाण यांनी दिले आहेत.
आदेशात म्हंटले आहे की, आपल्या अधिनिस्त सर्व प्रकारच्या खासगी अनुदानित सहकारी संस्था व शिक्षण संस्था मधील मनुष्यबळ त्यांना संस्थात नेमून दिलेल्या कामासाठीच वापर केला जाईल. याची दक्षता घेत असल्याबाबतचे याचे लेखी हमी पत्र सर्व संस्थाचालकांकडून घेण्यात यावे. आचारसंहितेबाबत पुर्ण जाणिव असून हे मनुष्य बळ कोणत्याही राजकिय पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरले जाणार नाही, संस्थाचालकांकडून मनुष्यबळाचा गैरवापर झाल्यास कारवाई केली जाईल, अशी लेखी ग्वाही संस्थाचालकांकडून घ्यावी. तसेच संस्थाचालकांकडून राजकीय प्रचारात मनुष्यबळाचा गैरवापर झाल्यास त्यांचे विरूद्ध तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश केकाण यांनी दिले आहेत.