Breaking News

अखेरच्या लढतीत भारतीय महिला संघाचा दारुण पराभव

सुरत /वृत्तसंस्था
 फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाला शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहाव्या ट्वेन्टी-20 सामन्यात 105 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु या  पराभवानंतरही भारताने मालिकेत 3-1 असे यश संपादन केले.
कारकीर्दीतील 100वा ट्वेन्टी-20 सामना खेळणार्‍या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आफ्रिकेने 17.3 षटकांत अवघ्या 70 धावांत गुंडाळले. आफ्रिकेची सलामीवीर लिझेल ली सामनावीर, तर  मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारी दीप्ती शर्मा मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली. उभय संघांतील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 9 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ली (84) आणि सुन लुस (62) या सलामीवीरांनी पहिल्या गडयासाठी 144 धावांची भागीदारी रचून आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे आफ्रिकेने 20 षटकांत 3  बाद 175 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
मग भारताची सुरुवात निराशाजनक झाली. नॅडिन डीक्लर्क (3/18)आणि शमनिम इस्माइल (2/11) यांच्या भेदक मार्‍यापुढे अवघ्या 13 धावांच्या मोबदल्यात भारताने आघाडीचे सहा फलंदाज गमावले. परंतु  अनुभवी वेदा कृष्णमूर्ती (26) आणि अरुधंती रेड्डी (22) यांनी सातव्या गडयासाठी 49 धावांची भागीदारी रचून आफ्रिकेच्या गोलंदाजांना झुंजवले. मात्र अ‍ॅने बॉसने वेदाला पायचीत केले, तर दोन षटकांच्या अंतरात  डीक्लर्कने अरुंधतीला माघारी पाठवून भारताच्या आशांना सुरंग लावला. नाँदुमिसो शँगेसने अनुजा पाटीलचा शून्यावर त्रिफळा उडवत आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेदा आणि अरुंधती वगळता एकाही  भारतीय फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : 20 षटकांत 3 बाद 175 (लिझेल ली 84, सुन लुस 62; अरुंधती रेड्डी 1/28) विजयी वि. भारत : 17.3 षटकांत सर्व बाद 70 (वेदा कृष्णमूर्ती 26, अरुंधती रेड्डी 22; नॅडिन डीक्लर्क  3/18). सामनावीर : लिझेल ली  मालिकावीर : दीप्ती शर्मा