Breaking News

सुसज्ज ग्रंथालयावरच संस्थेचे मूल्यांकन अवलंबून ः डॉ.बार्नबस

अहमदनगर/प्रतिनिधी
“शैक्षणिक संस्थेच्या ज्ञानाचे संवादाचे भांडार म्हणजे ग्रंथालय, काळानुसार त्याचे स्वरूप व गरज बदलत आहे, डिजीटल युगात आज सर्व ग्रंथालये अत्याधुनिक सेवासुविधा देणारी असली पाहिजे त्यासाठी आजची कार्यशाळा महत्वाची असून एखाद्या शैक्षणिक संस्थेचे मूल्यांकन व पत त्या संस्थेच्या सुसज्ज ग्रंथालयावरच अवलंबून असते’’, असे मत नगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी व्यक्त केले.
बीपीएचई सोसायटीच्या आयएमएस संस्थेत दिल्लीच्या डेलनेट डाटाबेस कंपनीच्या वतीने आयोजित एकदिवसीय ‘स्ट्रॅटेजिक फॉर ट्रान्सफॉर्मिंग लायब्ररीज ग्रोइंग ट्रेंडस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन नगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.एच.के.कौल, डॉ.संगीता कौल, डॉ.नीला देशपांडे, सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे व डॉ.स्वाती बार्नबस, डॉ.मीरा कुलकर्णी, डॉ. उदय नगरकर उपस्थित होते. पुण्याच्या डेलनेटच्या नीला देशपांडे यांनी डेलनेटविषयी सखोल माहिती दिली.
कार्यशाळेत सहभागी विविध संस्थाच्या प्रतिनिधींनी मनोगतात आयएमएस संस्थेचे आभार व्यक्त केले. सर्व सहभागी सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. या कार्यशाळेस ग्रंथपाल, ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या विद्यार्थी व वाचक सहभागी झाले होते, अशी माहिती ग्रंथपाल डॉ. स्वाती बार्नबस यांनी दिली.