Breaking News

जिल्हाधिकार्‍यांचा आज ‘टॉक वुईथ कलेक्टर’ कार्यक्रम

अहमदनगर/ प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी स्वीप समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी हे शहरातील युवा वर्गाशी संवाद साधणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि.16) सकाळी 10 वाजता न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी ‘टॉक वुईथ कलेक्टर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी द्विवेदी निवडणूक यंत्रणेची तयारी आणि मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत पुढे येण्यासाठी आवाहन करणार आहेत. महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्ह्याच्या स्वीप समितीमार्फत मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी दिलीप थोरे व स्वीप समिती सदस्य तथा शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्या अचूक नियोजनातून हा सोहळा होत आहे.
सात महाविद्यालयांमधील निवडक असे 600 नवमतदार विधानसभा निवडणूक 2019 च्या निमित्ताने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी द्विवेदी यांच्याशी संवाद साधणार आहेत. लोकशाही, निवडणूक, भारत निवडणूक आयोग, मतदान व देशाच्या प्रक्रियेमध्ये युवकांची भूमिका काय असावी याविषयी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘लोकशाहीचा उत्सव’ या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी होणार आहे. सेल्फी पॉइंट, मतदार सहायता कक्ष, युथ बूथ आणि क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या स्वीप वाहनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. कार्यक्रम एक तासाचा असेल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, न्यू आर्टस् कॉलेजचे प्राचार्य झावरे तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा निवडणूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.