Breaking News

श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण

कोळगाव/प्रतिनिधी :
श्रीगोंदे शहरात 12 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय मुलीचे मैत्रिणीसोबत क्लासला जात असताना अपहरण झाल्याची घटना (दि.4) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदे शहरात 12 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली 17 वर्षीय मुलगी मैत्रिणी सोबत दौंड रस्त्याने क्लासला जात होती. त्यावेळी पाठीमागून एक पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली. गाडीतील एका इसमाने खाली उतरवत त्या विद्यार्थिनीला बळजबरीने गाडीत बसविले. सगळा प्रकार अचानक झाल्याने तिच्यासोबत असणार्‍या मैत्रिणीसह त्या विद्यार्थिनीने आरडाओरडा केला. मात्र, बाजूच्या नागरिकांना काही समजण्याच्या आत ती पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ वेगाने कर्जतच्या दिशेने गेली. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना माहिती मिळाली असता यांनी घटनास्थळी धाव घेत श्रीगोंदे शहरातून जाणार्‍या सर्व रस्त्यावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले की, पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ असल्याची माहिती समजली असली तरी त्या गाडीचा क्रमांक अद्याप मिळाला नाही. ज्या ठिकाणाहून अपहरण झाले त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून लवकरच मुलीचा शोध घेतला जाईल. शहरातून भरदिवसा विद्यार्थीनीचे अपहरण झाल्याने महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.