Breaking News

भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवाराच्या आईला धमकी

कोल्हापूर
कागल विधानसभा मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केलेल्या समरजीत घाटगे यांच्या आईला फोनवरून धमकी देण्यात आली आहे. ’समरजीत घाटगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा,’ असं म्हणत फोनवरून धमकी देण्यात आली. समरजीत यांच्या आई सुहासिनीदेवी घाटगे यांना पाच वेळा फोन करून धमकी देण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत समरजीत हे कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहेत. भाजपमधून उमेदवारी मिळावी, यासाठी समरजीत यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्याने त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र आता त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्या आईला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कागल मतदारसंघ हा आतापर्यंत युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे राहिला आहे. यावेळी मात्र कागलवर भाजपकडून दावा सांगितला जात होता. भाजपच्या समरजितसिंह घाटगे यांनी आधी थेट स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करत कागल शहरामधून रॅली काढली होती. कागल शहरात समरजित सिंह घाटगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. मात्र नंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकली नाही.