Breaking News

शक्तींचे राजकारण आणि सक्तीची निवृत्ती !

लालकृष्ण अडवाणी यांच्या पिढीतील भाजपा नेत्यांची आज काय अवस्था आहे. ज्यांच्या अथक प्रयत्नांमधून भाजपा राक्षसी बहुमतापर्यंत पोहचली त्यांना राजकीय विजनवास सोसावा लागत आहे. महाराष्ट्रात  नाथाभाऊंच्या वाट्यालाही तेच आले आहे. राजकीय सत्तेच्या शक्तीने पात्रताधारक नेत्यांना केवळ महत्वाकांक्षेपोटी सक्तीची निवृत्ती घेण्यास भाग पाडले आहे.हा फार्म्युला केवळ स्वपक्षातील महत्वाकांक्षी नेत्यांसाठीच  वापराला जातो असे नाही तर शिवसेनेसारख्या मित्रपक्षांच्या बाबतीतही हेच धोरण वापरण्याची भाजपाची चाल आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राजकारण सोडणार नाही हा निर्धार उध्दव ठाकरेंनी बोलून  दाखविला असला तरी विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेचे अस्तित्व शोधण्याची वेळ न आली तरच नवल. अशाच आजच्या घडामोडी सांगत आहेत.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही पाठ्यपुस्तकात शिकलेली म्हण विद्यमान राजकारणाने अगदीच मिथ्या ठरवली आहे.या ऐवजी बळी तो कान पिळी या म्हणीचा प्रत्यय राजकारणात नित्य येऊ लागला आहे. ज्याची सत्ता  त्याचीच मत्ता चालणार, मग भलेही सत्ता कुणामुळे आली याचे भान बाळगण्याचे बंधन पाळण्याची गरज नाही.अर्थात राजकारणातील बाहुबलींवर अंगात रग आहे तोवर बळाची माञा चालत नाही हे खरे असले तरी  इथेही मर्यादा आहेतच. बाहुबली असा आकळत नसेल तर त्याला सत्तेचा वापर करून कायद्याची वेसन टोचून दावणीला बांधण्यात सत्ताधारी यशस्वी होतात. अलिकडच्या काही वर्षात आपल्या राजकारणात अशा  सत्ताधारी बळाला सुगीचे दिवस आल्याचे पहायला मिळते आहे. भारतात राजकारणातील विरोधकांना संपविण्यासाठी सत्तेचा वापर केल्याची अनेक उदाहरण आहेत. डावे आणि उजव्यांच्या मधे असलेले मवाळ धर्म  निरपेक्षवाद्यांनीही सत्तेचा वापर करून विरोधकांना हाराकीरीला आणले. मात्र तुलनात्मक दृष्ट्या पाहीले तर मवाळ धर्मनिरपेक्षवाद्यांनी विरोधकांना संपवितांनाही मुल्यांची जपणूक केली. त्या तुलनेत डावे आणि उजवे  मुळतःच कडव्या विचारांचे असल्याने त्यांची विरोधकांच्या बाबतीत असलेली भुमिकाही तितकीच कडवी असल्याचे पहायला मिळते.आपला कडवा अजेंडा पुर्णत्वास नेण्यासाठी ही मंडळी कुठल्याही थराला  जाऊ शक ते, हे देशाने अनुभवले आहे, आजही अनुभवत आहे.आपल्या धोरणाला जराही विरोध केलेला यांना पचत नाही. भुतकाळात कधी काळी एखाद्याने अनावधानाने केलेली कृती असेल किंवा वक्तव्य असेल तर त्याची   अद्दल भविष्यात कुठल्याही वेळी घडवली जाऊ शकते. हे देशाने पाहीलय. महत्वाकांक्षी नेतृत्वाला प्रतीमहत्वाकांक्षा असलेल्या नेतृत्वाची नेहमीच आव्हानात्मक भिती वाटत असते, अशा आव्हानाला फळ येण्यापुर्वीच  फांद्या छाटण्याचे काम केले जाते.
थेट सांगायचे झाले तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने अलिकडच्या काळात हेच धोरण स्वीकारले आहे. एकेकाळी तेंव्हाचा जनसंघ आणि आताचा भाजपात येण्यास राजकारणी लोक धजावत नव्हते. आज  पक्षातील नेत्यांनाच घरचा रस्ता दाखविण्याचा धडाका लावला आहे.ज्या नेत्यांमुळे आज सत्तेची फळे चाखायला मिळत आहेत त्यांनाच सक्तीची निवृत्ती घ्यायला भाग पाडले जात आहे. दोन खासदारांवरून देशाची कें द्रीय सत्ता पाशवी बहुमताने जिंकण्यापर्यंत मजल ज्यांच्यामुळे मारली ते अटल अडवाणी आणि त्यांच्याच फळीतील मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांची पिढी भाजपातच काय देशाच्या राजकारणातही हातपाय  हलवू शकत नाहीत एव्हढी त्यांची अवस्था बेदखल करून ठेवली आहे. राष्ट्रीय राजकारणात जे अडवाणींचं झालं, तेच एकनाथ खडसे, विनोद तावडे  यांच्यासारख्या नेत्यांचे झाले आहे.लालकृष्ण अडवाणी यांनी  अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाला सन्मान देऊन भाजपाचा रथ देशभर नेला,त्या परिश्रमावर आज नरेंद्र मोदी आणि कंपनी सत्तेची फळ चाखत आहे. अडवाणींनी पक्षासाठी घाम गाळला त्यांना सत्ता मिळताच  राजकीय विजनवास भोगावा लागत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी ज्यांच्याकडून सन्मान मिळायला हवा त्या चेल्यांकडून जाणीवेची दृष्टीही मिळत नाही.चेले समोर आलेल्या पक्षातील अडवाणींसारख्या भिष्माचार्यांकडे  साधे वळूनही पहात नाही.एव्हढी सत्तेची मस्ती चढली आहे. राष्ट्रीय पातळीवर जे अडवाणींच्या वाट्याला आले. तेच महाराष्ट्रात नाथाभाऊंच्या नशीबी आले.
अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत महाराष्ट्रात भाजपाला वाढविण्यात एकनाथ खडसे यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या चाळीसा एकेचाळीस वर्षाच्या राजकारणात त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका  घेण्याची हिम्मत कुणाला झाली नाही. राजकीय दुष्काळात  भाजपाच्या रोपट्याला सत्तेचा वटवृक्ष बनविण्यात स्व. गोपीनाथ मुंडे इतकेच परिश्रम नाथाभाऊंने घेतलेत. तेच  नाथाभाऊ आज निवृत्तीचं जीणं जगत  आहेत या निमित्तानं गेल्या जवळपास चाळीस  वर्षांचा काळ झरझर अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. भाजपाचे नाथाभाऊ फर्डा वक्ता, उत्तम प्रशासक, विधिमंडळ गाजवणारा पक्षनेता एकेकाळी तिकीट वाटप  ज्यांच्या होकाराशिवाय व्हायचं नाही, युती तोडण्याची जबाबदारीही ज्याच्यावर सोपवण्यात आली असा नेता नाथाभाऊ रिटायर्ड होत आहेत. भाजपानं त्यांना सीआरएस अर्थात सक्तीची निवृत्ती दिलीय. खडसेंनाही हा  निर्णय स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. भ्रष्टाचाराचे आरोप सातत्यानं पक्षविरोधी भूमिका पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्यं थेट मुख्यमंत्र्यांवर टीका त्यामुळे पक्षाला डोईजड झालेले खडसे खडसेंचं वय आणि प्रकृती  पाहता मुक्ताईनगर मतदारसंघात नवीन माणूस तयार करणं ही पक्षाची गरज होती.. म्हणूनच मुक्ताईनगरमधून खडसेंची मुलगी आता रोहणी खडसे लढणार आहेत.
रक्षा आणि रोहिणी या खडसेंच्या नव्या वारसदार ठरतील. खडसेंच्याच भाषेत सांगायचं झालं तर कालाय तस्मै नमः याला पर्याय नाही. भाजपाने शिवसेनेलाही असाच सक्तीच्या निवृत्तीचा घाट दाखविण्यास प्रारंभ के ला आहे.युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला दिलेले दुय्यम स्थान आणि केलेली धुळफेक या खेळीची सुरूवात आहे.त्याचा संताप शिवसेने आरेमधील वृक्षतोडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून व्यक्त करीत आहे,याच मुद्याचे  औचित्य साधून स्वतः उध्दव ठाकरे यांनी युतीधर्माच्या सर्व मर्यादा ओलांडून नरेंद्र देवेंद्रावर मनसोक्त तोंडसुख घेतले आहे.त्याची परतफेड भाजपाकडून 21 आक्टोबरला झाली नाही तर ते आजच्या सुडाच्या राजक ारणाला तिलांजली देणारे ठरेल. भाजपा नितीकडून हे असे होणे अपेक्षित नाही.